Beed: नोकरी लावतो म्हणून शंभरहून जास्त लोकांची फसवणूक, प्रत्येकाकडून 15-20 हजार रुपये घेऊन आरोपी पसार
Beed News : फरार झालेल्या आरोपीविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड: कोरोना काळात नोकरी लावून देतो म्हणून शंभरहून जास्त लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या प्रत्येकाकडून 15 ते 20 हजार रुपयांची रक्कम औरंगाबादच्या एका व्यक्तीने उकळल्याचं स्पष्ट झालं असून त्याच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या पंचशील नगर भागात राहणाऱ्या सुधीर हजारे यांना कोरोना काळात नोकरी गमवावी लागली. औरंगाबादच्या अमोल साळवे याने सुधीर हजारे यांना शासकीय रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला लावून देतो म्हणून त्यांच्याकडून वीस हजार रुपयांची रक्कम उकळली. पैसे देऊन एक वर्ष उलटल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी अमोल साळवेच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सुरुवातीला अमोल साळवे यांने बीडमधील आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला, त्यांची भेट घेऊन आपण सुरक्षारक्षकांची भरती करत असल्याचे सांगून त्यांच्यामार्फत अनेकांशी संपर्क केला आणि बनावट कागदपत्र तयार करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवलं.
अमोल साळवे या व्यक्तीने एकट्या सुधीर हजारे यांनाच फसवलं नाही तर बीड जिल्ह्यात तब्बल शंभरहून अधिक लोकांचे पैसे त्यांना नोकरीला लावून देतो म्हणून उकळले. औरंगाबादमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांची ट्रेनिंग देखील घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय रुग्णालय आणि जिल्हा परिषदेमध्ये त्यांना सुरक्षा रक्षकांची नोकरी लागल्याचं बनावट अपॉइंटमेंट लेटरदेखील या लोकांना देण्यात आलं.
अमोल साळवे यांना सुरुवातीला बीडमधील लोकांना नोकरीचं आमिष दाखवून गंडा घातला. त्यानंतर पाटोदा, केज, अंबाजोगाई आणि परळीतील लोकांना देखील त्यांनं असंच नोकरीच आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले. एवढेच नाही तर काही लोकांना सुरक्षा रक्षकांचे कपडे देखील दिले आणि शेवटी सगळे पैसे हडप करून पसार झाला.