Badlapur Crime: वडिलांसोबत दुकानाबाहेर गप्पा मारल्या अन् क्षणात भोसकलं; बदलापुरात लेकाकडूनच जन्मदात्याचा खून
बदलापूरच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा एक व्यावसायिक गाळा असून तो खान कॅटरर्स यांना भाड्याने दिला आहे.

ठाणे : बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं हादरेललं बदलापूर (Badlapur) आणखी एका घटनेनं हादरलं असून पोटच्या लेकानेच वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रॉपर्टी आणि पैशाच्या वादातून गप्पा मारता मारता ही घटना घडली. अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतलं आहे. पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिसांकडून (Police) अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
बदलापूरच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा एक व्यावसायिक गाळा असून तो खान कॅटरर्स यांना भाड्याने दिला आहे. या गाळ्यात मुलगा गणेश कराळे आणि त्याचे वडील अनंत कराळे हे बुधवार आज रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास आले होते. त्यानंतर भाडेकरूंना दुकानाच्या बाहेर काढून ते दुकानाच्या मागच्या बाजूला गप्पा मारण्यासाठी गेले. मात्र, याच वेळेस गप्पा मारता मारता त्यांच्यात वाद झाले आणि मुलाने वडिलांच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अनंत कराळे यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अनंत कराळे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा
अंजली दमानियांचा संशय ठरतोय खरा, कळंबमधील महिलेची गाडी कोणाच्या नावावर? पोलीस तपासात समोर























