Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकी यांच्यावर वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात गोळीबार करण्यात आला. त्यांच्या गाडीवर गोळ्या लागल्या आहेत.
मुंबई: अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर बुधवारी रात्री वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबईतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच भायखळा परिसरात अजितदादा गटाचे नेते सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याने पोलीस आणि गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काहीवेळापूर्वीच लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन हल्लेखोरांनी एकूण सहा गोळ्या झाडल्या होत्या. यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत आणि डोक्यात शिरल्या होत्या. त्यामुळे बाबा सिद्दिकी गंभीर जखमी झाले होते. त्यांना जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल नेण्यात आले. बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती कळताच त्यांचे नातेवाईक लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. काहीवेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस, मोहित कंबोज आणि आशिष शेलार हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्याकडून गोळीबाराच्या घटनेची माहिती घेतली जाऊ शकते. देवेंद्र फडणवीस यांची गाडी ज्यावेळी लीलावती रुग्णालयात दाखल झाली त्यावेळी या परिसरात बाबा सिद्दिकी समर्थकांची प्रचंड गर्दी जमली होती. फडणवीसांची गाडी दिसताच या समर्थकांनी 'इन्साफ चाहिए' अशा घोषणा दिल्या. त्यामुळे आता लीलावती रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बाबा सिद्दिकी गोळीबाराचं कनेक्शन लॉरेन्स बिष्णोई गँगशी?
या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एका हल्लेखोराचे नाव शिवा असल्याचे समजते. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा यामध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी सलमान खानच्या घरावरही गोळीबार केला होता. हल्ल्याच्या ठिकाणी पोलिसांना एक पिस्तूल मिळाली आहे. हल्लेखोरांनी अगदी जवळून बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. आमचा तपास अजूनही प्राथमिक स्तरावर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आणखी वाचा
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच