औरंगाबाद हादरलं! दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्याने घेतला गळफास, आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल
Aurangabad Farmer Suicide : गरिबी आणि आर्थिक विवंचनेतून संसाराचा गाडा हाकताना आलेल्या नैराश्यातून या शेतकरी दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.
Aurangabad Farmer Suicide : औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे दुर्दैवी घटना समोर आली असून, दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गरिबी आणि आर्थिक विवंचनेतून संसाराचा गाडा हाकताना आलेल्या नैराश्यातून या शेतकरी दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. शेतात कामासाठी गेलेल्या शेतकरी दाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. राजू दामोधर खंडागळे (वय 28) आणि अर्चना राजू खंडागळे (वय 26) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे.
बंडखोरी, पक्षाची फोडाफोडी आणि सत्तेसाठी व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधी यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ नसल्याचा आरोप होत असतांना, गरिबी आणि आर्थिक विवंचनेतून संसाराचा गाडा हाकताना आलेल्या नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करत आहे. अशीच काही घटना औरंगाबादच्या रांजणगाव खुरी या गावात घडली आहे. राजू खंडागळे आणि त्यांची पत्नी अर्चना राजू खंडागळे यांनी एकाचवेळी एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
राजू खंडागळे यांच्याकडे वडिलोपार्जित 2 एकर शेती आहे. तर कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. आईवडील आणि दोघा भावांच्या संसाराचा उदरनिर्वाह 2 एकर शेतीवर भागत नव्हते. त्यामुळे राजू यांनी गावातील एका शेतकऱ्याची शेती बटाईने केली होती. मात्र मागच्या वर्षे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आणि यंदा जुलै महिना संपत आला असतांना अपेक्षित पाऊस झाला नाही. अशात आर्थिक तंगीमुळे संसारात ओढाताण होऊ लागली. यामुळे राजू खंडागळे नैराश्यात होते. दरम्यान, शुक्रवारी दोघेही पती पत्नी शेतात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत दोन वर्षांची मुलगीही होती. सहा वाजता राजू यांच्या वडिलांनी त्यांना फोन लावून विचारणा केली असता, शेतातून निघालो असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बराच वेळ होऊन देखील न आल्याने पुन्हा फोन लावला. मात्र, राजू फोन उचलत नसल्याने कुटुंबातील सदस्य शेतात गेले. यावेळी राजू आणि अर्चना दोघेही झाडाला गळफास घेतेलेल्या अवस्थेत आढळून आले.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
या बाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही बिडकीन शासकीय रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तर याची माहिती मिळताच बिडकीन ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, बीट जमादार एस. व्ही. वाघमारे, शिवानंद बंगे यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :