धक्कादायक! मराठवाड्यातील 1 लाखांपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात; खळबळजनक अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती
Marathwada Farmer Suicide : मराठवाड्यातील 1 लाख 5 हजार 754 शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Marathwada Farmer Suicide : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा (Marathwada) विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला होता. ज्यात पाच लाख कुटुंबाचे 12 टप्प्यात आणि 100 प्रश्न तयार करुन हा सर्व्हे करण्यात आला होते. दरम्यान या सर्वेक्षणाचा खळबळजनक अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. ज्यात मराठवाड्यातील 1 लाख 5 हजार 754 शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यात एक सर्वेक्षण केला होता. यामध्ये एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबाची माहिती भरुन घेण्यात आली होती. सर्वेक्षण करताना प्रश्नांचे एकूण बारा विभाग करण्यात आले. यात एकूण 104 प्रश्नांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत भरुन घेण्यात आली. यात आत्महत्या करण्याच्या विचारत असलेल्या शेतकऱ्यांची वेगळी यादी तयार करण्यात आली. तर एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबांपैकी 1 लाख 5 हजार 754 शेतकरी कुटुंब अति संवेदनशील यादीत म्हणजेच आत्महत्या करण्याच्या विचारत असल्याचे समोर आले आहेत. तर 2 लाख 98 हजार 51 शेतकरी कुटुंब संवेदनशील आढळून आली आहे.
शेतकरी आत्महत्यांची 'ही' आहेत कारणं?
केंद्रेकर यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार औरंगाबाद विभागात सन 2012 ते 2022 या कालावधीत एकूण 8 हजार 719 शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी 923 नापिकीमुळे, 1 हजार 494 कर्जबाजारीपणामुळे, 4 हजार 371 नापिकी व कर्जबाजारीपणा या दोन्ही एकत्रित कारणामुळे तर 2 कर्ज परतफेडीच्या तगाद्यामुळे आणि 1 हजार 929 इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
इतर कारणे देखील शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत
सद्यस्थितीत शासनाने शेतकरी आत्महत्या प्रकरणी अनुदान देताना केलेल्या निकषात कर्जबाजारीपणा, नापिकी व कर्जपरतफेडीचा तगादा हे तीन निकष निश्चित केले आहेत. मात्र, या तीन कारणांव्यतिरिक्त इतर कारणे देखील शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.
असा झाला सर्वेक्षण!
प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणा दरम्यान शेती विषयक संबंधित व्यक्तीशी तसेच मानसोपचार तज्ञांशी चर्चेअंती सर्वसमावेशक असा एकूण 130 प्रश्नांचा सर्वेक्षण नमुना तयार करण्यात आला होता. तसेच जिल्हाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि शेतकरी यांच्याशी चर्चा करुन सर्वेक्षण नमुन्यातील प्रश्नांच्या गांभिर्यानुसार प्रश्नांना गुणांक देण्यात आले. सर्वेक्षण करुन ऑनलाईन माहिती भरण्यात आलेल्या एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबांच्या माहितीचे विश्लेषण करुन 75 पेक्षा जास्त गुणांक असलेल्या शेतकरी कुटुंबांचा समावेश अति संवेदनशील कुटुंबांमध्ये तर 50 पेक्षा जास्त गुणांक असलेल्या कुटुंबांचा समावेश संवेदनशील कुटुंबांमध्ये करण्यात आला.
संबंधित बातम्या: