Sangli Mass Suicide : नऊ जणांच्या आत्महत्या प्रकरणी 25 जणांवर गुन्हा, 11 जण ताब्यात
Sangli Mass Suicide : मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील नऊ जणांच्या आत्महत्या प्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल केला असून 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
Sangli Mass Suicide : सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील नऊ जणांच्या आत्महत्या प्रकरणी 25 जणांवर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सगळ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे अकरा जण छोटे-मोठे सावकार आहेत. दरम्यान पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम हे सकाळी साडेदहा वाजता या घटनेबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत.
म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये सोमवारी (20 जून) दोन सख्ख्या भावाच्या कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आले होते. प्राथमिक माहितीनुसार सांगलीतील मिरज परिसरात राहणाऱ्या या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिरज तालुक्यातील म्हैसाळच्या अंबिकानगर भागातील एका घरात काल नऊ जणांचे मृतदेह सापडले होते. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन सख्ख्या भावांच्या संपूर्ण कुटुंबातील हे सर्व मृतदेह आहेत. तपासात कोणाच्याही अंगावर जखमेच्या खुणा आढळलेल्या नाहीत. दोन्ही भावांच्या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. याशिवाय घटनास्थळावरुन कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे एसपी आणि आयजीही घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांनी फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण केले होते. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही सामूहिक आत्महत्या आहे की अन्य कारणे आहेत याचाही तपास सुरु आहे.
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा संशय
सध्या या सर्व मृतदेहांसोबत कोणतीही सुसाईड नोट न मिळाल्याने कर्जबाजारी होऊन या दोन भावांच्या कुटुंबीयांनी ही सामूहिक आत्महत्या केली असावी, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. एका खोलीत तीन मृतदेह तर दुसऱ्या खोलीत सहा मृतदेह सापडले.
दरम्यान आर्थिक, सावकारीच्या जाचातून वनमोरे कुटुंबाने आत्महत्या केल्याचा संशय असला तरी सुशिक्षित कुटुंबाने व्याजाने पैसे घेऊन नेमके कुठे गुंतवले? याचाही पोलिसांना उलगडा करावा लागणार आहे.
आत्महत्या केलेल्यांची नावे
पोपट यल्लापा वनमोरे (वय 52 वर्षे)
संगीता पोपट वनमोरे (वय 48 वर्षे)
अर्चना पोपट वनमोरे (वय 30 वर्षे)
शुभम पोपट वनमोरे (वय 28 वर्षे)
माणिक यल्लापा वनमोरे (वय 49 वर्षे)
रेखा माणिक वनमोरे (वय 45 वर्षे)
अनिता माणिक वनमोरे (वय 28 वर्षे)
आदित्य माणिक वनमोरे (वय 15 वर्षे)
अक्काताई वनमोरे (वय 72 वर्षे)
संबंधित बातम्या