Credit Card Limit : क्रेडिट कार्डची मर्यादा कमी का होते? 'ही' आहेत पाच महत्त्वाची कारणं!
क्रेडिट कार्डची मर्यादा कमी झाल्याचे तुम्ही अनेकवेळा ऐकले असले. पण क्रेडिट कार्ड कंपनी किंवा बँकेकडून हा निर्णय काही विशिष्ट परिस्थितीतच घेतला जातो.
मुंबई : तुम्ही अनेकवेळा पाहिलं असेल की काही बँका त्यांच्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची मर्यादा (Credit Card Limit) कमी करतात. विशिष्ट परिस्थितीतच अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो. याच पार्श्वभूमीवर बँका क्रेडिट कार्डची मर्यादा कमी करण्याचा निर्णय का घेतात? हे जाणून घेऊ या..
बील देण्यासाठी विलंब केल्यास
क्रेडिट कार्डचे बील देण्यासाठी विलंब केल्यास बँक तुमच्याकडे धोकादायक ग्राहक म्हणून बघते. क्रेडिट कार्डचे बिल देण्याएवढे तुमच्याकडे पैसे नाहीत, असे बँक गृहित धरते. अशा स्थितीत तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा कमी केली जाते.
बील पुढील महिन्यासाठी कॅरी फॉरवर्ड केल्यास
क्रेडिट कार्डचे बील देताना तुम्ही फक्त मिनिमम ड्यू देत असाल आणि उर्वरित बील पुढील महिन्यासाठी कॅरी फॉरवर्ड करत असाल तर तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा कमी होऊ शकते. तुम्ही दोन ते तीन वेळा मिनिमम ड्यू भरून कॅरी फॉरवर्डचा पर्याय निवडल्यास काहीही अडचण येणार नाही. कारण तुम्ही बाकी रकमेवर व्याज भरता. ज्यामुळे क्रेडिट कार्ड कंपन्यांना फायदा होतो. मात्र तुम्ही हा पर्याय नेहमीच वापरत असाल तर तुमचे क्रेडिट कार्ड बील वाढतच जाईल आणि तुम्ही कदाचित कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. अशी स्थिती क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी धोकादायक ठरते. त्यामुळे हा संभाव्य धोका लक्षात घेऊन तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा कमी केली जाऊ शकते.
क्रेडिट कार्डचा मर्यादेपेक्षा अधिक वापर
काही ग्राहक क्रेडिट कार्डचा मर्यादेपेक्षा अधिक वापर करतात. तुमचा क्रेडिट कार्ड युटिलायझेशन रेशो जास्त असेल तर तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा कमी केली जाते. तुम्ही क्रेडिट कार्डचा मर्यादेपेक्षा जास्त वापर करत असाल तर तुमच्यावरील कर्ज वाढत जाणार, असे गृहित धरले जाते आणि क्रेडिट कार्ड देणारी कंपनी तुमच्या क्रेडिटची मर्यादा कमी करते.
एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्सचा वापर
काही लोकांकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्स असतात. असे केल्याने संबंधित व्यक्तीची क्रेडिट कार्डची मर्यादा पटकन वाढते. एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड वापरल्यास संबंधित व्यक्तीला वापरण्यासाठी जास्त पैसे उपलब्ध होतात. अशा स्थितीत तुम्ही कर्जावर जास्त अवलंबून आहात, असे गृहित धरले जाते. त्यामुळे तुमच्या क्रेडिटची मर्यादा कमी केली जाते.
क्रेडिट कार्डचा वापर फारच कमी असल्यास
क्रेडिट कार्डचा फारच कमी वापर केल्यावरही तुमच्या कार्डची मर्यादा कमी केली जाते. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरले तरच बँकांचा फायदा होतो. पण तुम्ही ते वापरतच नसाल तर त्याचा बँकेला काहीही फायदा नाही. याच कारणामुळे तुम्ही क्रेडिट कार्डचा फारच कमी वापर करत असाल तर तुमची लिमिट कमी केली जाते.
हेही वाचा :
या आठवड्यात येणार तीन तगडे आयपीओ, पैसे घेऊन राहा तयार, मालामाल होण्याची नामी संधी!
SBI कडून MCLR रेटमध्ये वाढ, होम लोन, कार लोनचा हफ्ता वाढणार; सामान्यांना झटका!
ITR Filing : आयटीआर भरण्याआधी 'हे' काम आवर्जून करा, अन्यथा ऐनवेळी येऊ शकते अडचण!