तुम्हीही 'ड्रीप प्राईसिंग'चे बळी ठरलाय का? जाणून घ्या ग्राहकांची फसवणूक नेमकी कशी होते?
ग्राहकांना कंपन्या वेगवेगळ्या मार्गांनी लुटतात. आता ड्रीप प्राईसिंगच्या नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : आपल्या कंपनीच्या उत्पादनांची विक्री वाढावी म्हणून कंपन्या अनेक क्लृप्त्या वापरतात. काही ठिकाणी तर एमआरपीपेक्षाही अधिक किमतीने कंपन्या त्यांची उत्पादनं विकतात. यालाच ड्रीप प्राईसिंग (Drip Pricing) म्हटलं जातं. याच ड्रीप प्राईसिंगला आळा घालण्यासाठी अमेरिकेने ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भारत सरकारनेदेखील ड्रीप प्राईसिंग रोखण्यासाठी खास हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. कोणताही ग्राहक ड्रीप प्राईसिंगची शिकार होत असेल तर त्यांनी थेट या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन सरकारने केलंय.
केंद्र सरकारने जारी केला हेल्पलाईन नंबर
ड्रीप प्राईसिंगबाबत तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. एनसीएच 1915 (NCH 1915) या क्रमांकावर किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 8800001915 वर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील ड्रीप प्राईसिंगचा बिमोड करण्यासाठी ठोस पावलं उचलवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कमी किंमत दाखवून ग्राहकांना केलं जात आकर्षित
डिपार्टमेंट ऑफ कंझ्यूमर अफेयर्सने (ग्राहक व्यवहार विभाग) समाजमाध्यमावर या ड्रीप प्राईसिंगबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ड्रीप प्राईसिंगच्या अंतर्गत ग्राहकांना एमआरपीपेक्षाही अधिक किमतीने एखादे उत्पादन खरेदी करण्यास उद्युक्त केले जाते. हे समजाऊन सांगण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने एक उदाहरणही दिले आहे. समजा एखाद्या बुटाची किंमत 4700 रुपये आहे. मात्र ड्रीप प्राईसिंगअंतर्गत अतिरिक्त चार्जेस जोडून तोच बुट तुम्हाला 5100 रुपयांना विकला जातो.
अमेरिकन सरकार काय निर्णय घेण्याच्या तयारीत?
अमेरिकेचे सरकारदेखील या ड्रीप प्राईसिंगवर कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याबाबत जो बायडेन यांनी मार्च महिन्यात एक ट्विट केले होते. आम्ही ड्रीप प्राईसिंग हा प्रकार संपवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. आम्ही ड्रीप प्राईसिंगसह अन्य प्रकारचे चार्जेसही संपवणार आहोत, असे जो बायडेन म्हणाले होते.
ड्रीप प्राईसिंग म्हणजे काय?
ड्रीप प्राईसिंगच्या अंतर्गत तुम्हाला एखाद्या उत्पादनाची मूळ किंमत दाखवली जात नाही. संबंधित उत्पादन फार स्वस्त आहे, असे भासवले जाते. मात्र तुम्ही प्रत्यक्षात ते खरेदी करायला गेल्यावर त्याची किंमत वाढलेली असते. ड्रीप प्राईसिंग अंतर्गत वेगवेगळे कर किंवा बुकिंग चार्ज कमी केला जातो. त्यामुळे ग्राहक फसतात आणि एमआरपीपेक्षाही कितीतरी महाग किमतीत संबंधित उत्पादन खरेदी करतात.
हेही वाचा :
बीएसएनएल कंपनी संकटात? कर्मचाऱ्यांचे थेट केंद्र सरकारला पत्र!
शेअरची किंमत फक्त 1 रुपया, पण गुंतवणूकदारांची होतेय भरघोस कमाई, ही कंपनी देणार बंम्पर रिटर्न्स?
मुथूट फायनान्सची उपकंपनी बेलास्टारचा लवकरच येणार आयपीओ, भरघोस नफा मिळवण्याची नामी संधी!