IPO News : नवीन वर्षात कमाईची संधी! झिंक ऑक्साईड उत्पादक कंपनीचा आयपीओ होणार सुचीबद्ध
IPO News : JG केमिकल्सने आयपीओद्वारे निधी उभारण्यासाठी देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत.
IPO News : इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात तुम्हाला आणखीन एक कमाईची संधी देणारा आयपीओय लवकरच बाजारात सुचीबद्ध होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे हे वर्षही आयपीओद्वारे कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खूप खास ठरू शकते. अनेक कंपन्या त्यांचे आयपीओ एकापाठोपाठ एक बाजारात आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर झिंक ऑक्साईड बनवणारी JG केमिकल्स (zinc oxide manufacturing company) ही कंपनी आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे.
JG केमिकल्सने आयपीओद्वारे निधी उभारण्यासाठी देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत. कागदपत्रांनुसार, आयपीओ अंतर्गत 202.50 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स जारी केले जातील.
IPO News : उभारलेले भांडवल कुठे वापरले जाईल?
जेजी केमिकल्स विद्यमान प्रवर्तक गटाच्या भागधारकांद्वारे 57 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत आणले जातील. आयपीओमधून उभारलेले भांडवल त्याच्या उपकंपनी BDJ Oxides मध्ये गुंतवणूक आणि कर्ज परतफेडीसाठी वापरले जाईल.
IPO News : किमान 89 कंपन्या आयपीओ आणू शकतात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी म्हणजे 2023 मध्ये आयपीओ क्रियाकलापांमध्ये मोठी तेजी येऊ शकते. प्राइमडेटाबेसच्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. कारण मिळालेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये सुमारे 89 कंपन्या दलाल स्ट्रीटवर पदार्पण करतील आणि या कंपन्या 1.4 लाख कोटी रुपये उभे करतील असा अंदाज आहे. 2021 मध्ये एकूण 63 कंपन्यांनी आयपीओद्वारे 1.19 लाख कोटी रुपये उभे केले. तर 2022 मध्ये नोव्हेंबरपर्यंत 33 कंपन्यांनी 55,145.80 कोटी रुपये उभारले आहेत.
टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात येणार?
दरम्यान, टाटा समूह देखील विविध क्षेत्रात आक्रमकपणे उतरत आहे. टाटा समूहातील बिग बास्केट कंपनीचा आयपीओ येणार आहे. टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन स्टोअपैकी एक असलेले टाटा बिग बास्केट आगामी काळात आपला आयपीओ बाजारात आणू शकते. बिग बास्केट या ऑनलाइन किराणा दुकानाचं मूल्य 3.2 अब्ज डॉलर आहे. टाटा समूहाची बिग बास्केट तीन वर्षांच्या आत आयपीओ बाजारात दाखल करणार अशी सूत्रांची माहिती आहे. टाटांची बंगळुरू स्थित ई-कॉमर्स फर्म येत्या 24 ते 36 महिन्यांत प्रारंभिक सार्वजनिक ऑफर सुरू करेल अशी माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
जगात मंदीचं सावट पण भारताची अर्थव्यवस्था स्थिर, GDP 7 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज