मोठी बातमी! सोन्याच्या दरात घसरण, चीनकडून सोनं खरेदीला ब्रेक, दरांवर परिणाम
सोन्याची खरेदी (Gold) करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे भाव (Gold Price) मे महिन्याच्या विक्रमी उच्चांकावरून जवळपास 5 टक्क्यांनी घसरले आहेत.
Gold Price : सोन्याची खरेदी (Gold) करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे भाव (Gold Price) मे महिन्याच्या विक्रमी उच्चांकावरून जवळपास 5 टक्क्यांनी घसरले आहेत. देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या देशांतर्गत बाजारात प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव हा 71 हजार रुपयांच्या खाली गेला आहे.
सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण
सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. देशांतर्गत बाजारात प्रति 10 ग्रॅमचा भाव 71 हजार रुपयांच्या खाली गेला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 2,300 डॉलरच्या आसपास आहे. मे महिन्याच्या विक्रमी उच्चांकावरुन किंमती सुमारे 5 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. सोन्याच्या दराने गेल्या महिन्यात आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये, MCX वर सोन्याच्या किमतीने 22 मे 2024 रोजी विक्रम केला होता. यावेळी सोनं 74,442 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं होतं.
सध्या सोन्याचा दर किती?
जागतिक बाजारातील कमकुवत ट्रेंडमुळे आज देशांतर्गत स्पॉट मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या म्हणण्यानुसार, 24 कॅरेट (999) सोन्याचा भाव आज 737 रुपयांनी घसरून 71,176 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सुरुवातीच्या व्यापारात त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 70,905 रुपये होती. तर 23 मे 2024 रोजी सोन्याचे 24 कॅरेट (999) 74,222 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन उच्चांकावर दिसले. सध्या सोन्याच्या दरात होत असलेली घसरणं ही दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या अनेक दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ होत होती. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी कात्री लागत होती.
चीनकडून सोन्याच्या खरेदीवर ब्रेक
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या मध्यवर्ती बँकेने सोन्याच्या खरेदीवर लावलेल्या ब्रेकचा परिणाम भावांवर दिसून येत आहे. चीनची मध्यवर्ती बँक पीपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी) कडून प्राप्त झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, या वर्षी मे महिन्यात चीनच्या सोन्याच्या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही. याआधी चीनच्या सोन्याच्या साठ्यात सलग 18 महिने वाढ झाली होती. एप्रिलमध्ये चीनचा सोन्याचा साठा 2 टनांनी वाढून 2,264 टन झाला. चीनच्या सोन्याच्या साठ्यातील ही 18 महिन्यांतील सर्वात कमी वाढ होती. सेंट्रल बँक ऑफ चायना पुन्हा सोन्याच्या मासिक खरेदीची माहिती सामायिक करत आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेने 2023 मध्ये सोन्याच्या साठ्यात 225 टन वाढ केली होती.
महत्वाच्या बातम्या:
भारताचा विक्रम! महिनाभरातच खरेदी केलं 722 कोटी रुपयांचे सोनं, जगात भारत तिसऱ्या स्थानी