भारताचा विक्रम! महिनाभरातच खरेदी केलं 722 कोटी रुपयांचे सोनं, जगात भारत तिसऱ्या स्थानी
गेल्या महिन्यात (मे) भारतानं 722 कोटी रुपयांचे सोनं खरेदी केलं आहे. सोनं खरेदी करण्यात भारत जगात तिसरा क्रमांकांचा देश ठरला आहे.
India Gold Buying News : सध्या भारत (India) मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी (Gold Buying) करत आहे. गेल्या काही वर्षांत भारताच्या सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोनं खरेदीत विक्रम केला आहे. गेल्या महिन्यात (मे) भारतानं 722 कोटी रुपयांचे सोनं खरेदी केलं आहे. सोनं खरेदी करण्यात भारत जगात तिसरा क्रमांकांचा देश ठरला आहे.
महिनाभरात 45.9 टन इतक्या सोन्याची खरेदी
मिळालेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सोन्याचा खरेदीदार देश म्हणून समोर आला आहे. गेल्या महिन्यात भारताने 722 कोटी रुपयांचे सोने खरेदी केले आहे. ही खरेदी 45.9 टन इतकी आहे. सोन्याचा साठा वाढवण्यासाठी भारत अजूनही आक्रमक पवित्रा सोन्याची खरेदी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोने खरेदीत 'हे' दोन देश भारताच्या पुढे
गेल्या महिन्यात भारतानं मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली. मात्र, भारतापेक्षाही दोन देशांनी अधिक सोन्याची खरेदी केली आहे. सोने खरेदीच्या बाबतीत हे दोन देश भारताच्या पुढे आहेत. यामध्ये स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावर आहे. या देशानं महिनाभरात 312.4 टन सोने खरेदी केले आहे. या खरेदीचे मूल्य 2,461 कोटी रुपये आहे. तर आपल्या शेजारी असणाऱ्या चीनने 2,109 कोटी रुपयांचे 86.8 टन सोने खरेदी केले आहे. चीन दुसऱ्या स्थानावर आहे.
5 वर्षात सोन्याच्या खरेदीत 33 टक्क्यांची वाढ
सध्या भारतानं सोन्याच्या खरेदीत झपाट्यानं वाढ केली आहे. मागील काही वर्षांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मार्च 2019 मध्ये भारताकडे 618.2 टन सोन्याचा साठा होता. तर मार्च 2024 पर्यंत हा साठा 822.1 टन इतका वाढला होता. म्हणजेच गेल्या 5 वर्षांत भारताच्या सोन्याच्या साठ्यात 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अलीकडेच देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याला स्थिरता देण्यासाठी अधिक सोने खरेदी केले जात असल्याचे सांगितले होते. डॉलरच्या अस्थिरतेमुळे रिझर्व्ह बँकेला सोन्याचा साठा वाढवण्याची गरज भासू लागल्याचे दास म्हणाले होते.
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात लोकांचा कल वाढला
दरम्यान, अलिकडच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कारण इतर गुंतवणुकीच्या तुलनेत सोन्याची गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे. प्राचीन काळापासून सोन्याला गुंतवणूकदारांची पसंती आहे. आजच्या काळात, अनिश्चित वातावरणात सोने सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. यामुळेच जगात जेव्हा जेव्हा भू-राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा सोन्याची मागणी वाढते. त्याची किंमत वाढू लागते.
महत्वाच्या बातम्या: