(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening Bell : शेअर बाजारात घसरणीनंतर तेजी; बाजाराची सावध सुरुवात
Share Market Opening Bell : शेअर बाजारात आजही अस्थिरता राहण्याचे संकेत दिसून येत आहे. बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मात्र, त्यानंतर बाजार सावरला.
Share Market Opening Bell : गेले दोन दिवस बाजारात सुरू असलेल्या पडझडीला (Share Market Opening Bell ) लगाम लागला आहे. आजही शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मात्र, काही वेळानंतर बाजार सावरण्यास सुरुवात झाली. सेन्सेक्स निर्देशांकात (Sensex) 567 अंकांची घसरण होऊन बाजार खुला झाला होता. आज शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून कठोर पतधोरणाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच जागतिक पातळीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, तणावाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. त्याच्या परिणामी बाजारात घसरण सुरू आहे.
शेअर बाजार सुरु झाल्यानंतर झालेल्या पडझडीनंतर काही वेळाने बाजार सावरण्यास सुरुवात झाली. सेन्सेक्स 567 अंकांच्या घसरणीसह 58,205 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 133.35 अंकांच्या घसरणीसह 17,357.35 अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. त्यानंतर पुन्हा घसरण सुरू झाली. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 10 अंकांनी वधारत 58,784.46 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 2.75 अंकांनी वधारत 17,493.45 अंकांवर व्यवहार करत होता.
बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात खरेदीचा जोर दिसला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 17 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 13 शेअरमध्ये घसरण दिसली. तर, निफ्टी 50 मधील 30 शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसला. निफ्टी बँकमध्येही तेजी दिसून आली. बँक निफ्टीने 38,000 अंकांची पातळी ओलांडली.
निफ्टीमध्ये बँक, आयटी आणि रियल्टी सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टरमध्ये तेजी दिसून आली आहे. ऑटो, सिमेंट, मेटल, फार्मा, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू, मीडिया, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसून आली आहे.
बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, एनटीपीसी, मारुती, पॉवरग्रीड, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, टायटन, एल अॅण्ड टी, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, नेस्ले आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसत आहे.
गुंतवणुकदारांचे 6.5 लाख कोटींचे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसून येत होती. या दोन महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 45.6 लाख कोटी रुपयांची भर पडली होती. आता शुक्रवारी आणि सोमवारी झालेल्या पडझडीमुळे 6.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. सोमवारी झालेल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील भांडवली मूल्य 280.52 लाख कोटींवरुन ते 274.02 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.