(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पर्सनल लोन घेताना राहा सावधान, 'या' गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा येतील अडचणी!
आजकाल अनेक बँका, एनबीएफसी तुम्हाला पर्सनल लोनसाठी वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. पण अशा प्रकारचे कर्ज घेण्याआधी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
मुंबई : ऐनवेळी पैशांची गरज भासल्यास आपण पर्सनल लोनचा पर्याय निवडतो. आपत्कालीन स्थितीत पर्सनल लोनच्या माध्यमातून अगदी कमी काळात तुम्हाला कर्ज मिळू शकते. पण हाच पर्सनल लोनचा पर्याय निवडून कधीकधी तुम्हाला आर्थिक फटकादेखील बसू शकतो. भांडवलाच्या गरजेपोटी अनेकजण कोणताही विचार न करता पर्सनल लोनचा पर्याय निवडणे कधीकधी चुकीचे ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारचे कर्ज घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेऊ या...
व्याजदर काय आहे, हे जाणून घ्या
आजकाल राष्ट्रीय बँका, सहकारी बँका, पतसंस्था तसेच एनबीएफसी तुम्हाला पर्सनल लोन देण्यास तयार असतात. पण कोणतेही पर्सनल लोन घेण्याआधी काही गोष्टींचा विचार करायला हवा. यातील सर्वांत पहिला विचार हा व्याजदराचा आहे. तुम्ही घेताय ते पर्सनल लोन किती टक्के व्याजदारने दिले जात आहे. अन्य संस्था हेच कर्ज देताना किती टक्के व्याजदर आकारत आहेत, याचा विचार करायला हवा. जी संस्था सर्वांत कमी व्याजदराने पर्सनल लोन देते, त्याच संस्थेकडून कर्ज घ्यावे.
बँकेची ऑफर तपासा
एखाद्या बँकेत तुमचे अगोदरच खाते असेल तर तुमची क्रेडिट हिस्ट्री तसेच सीबील तपासून तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते. अशा स्थितीत कर्ज घेताना बँक तुम्हाला एखादी ऑफरही देऊ शकते. त्याची चौकशी करावी.
परतफेडीचा अवधी काय, हे विचारा
पर्सनल लोन घेताना त्याची परतफेड करण्याचा अवधी काय आहे? हे अगोदर समजून घ्यावे. कर्जफेडीचा अवधी लक्षात घेऊन बँक तुमचा ईएमआय ठरवते. कर्जफेडीचा अवधी कमी असेल तर व्याजदर कमी असतो. कर्जफेडीचा अवधी जास्त असेल तर तुमच्या कर्जावर जास्त व्याजदर आकारला जातो.
छुप्या चार्जेसविषयी जाणून घ्या
कोणतेही कर्ज देताना बँका तसेच एनबीएफसींना कर्जाशी संबंधित सर्व चार्जेसबाबत माहिती देणे गरजेचे असते. मात्र अनेक संस्था कर्जाबाबतच्या छुप्या चार्जेसविषयी ग्राहकांना माहिती देत नाहीत. अनेकवेळा ग्राहकही अशा छुप्या चर्जेसकडे दुर्लक्ष करतात. परिणामी ऐनवेळी अडचण येऊ शकते.
अनेक एनबीएफसी कर्ज देताना घाई करतात. अनेक ऑफर्सचे प्रलोभन दाखवतात. पण एखादा ईएमआय भरणे शक्य न झाल्यास याच संस्था ग्राहकांशी चुकीच्या पद्धतीने व्यवहार करतात. नियमानुसार कर्ज देणारी कोणतीही संस्था ग्राहकांशी उद्धटपणे तसेच कोणताही दुर्व्यवहार करू शकत नाहीत. एखादा ईएमआय भरायचा राहिल्यास बँका तुम्हाला अतिरिक्त वेळ देऊ शकतात. याबाबतही चौकशी करावी.
हेही वाचा :
दागिने घडवणाऱ्या प्रसिद्ध कंपनीचा IPO आला, पैसे कमवण्याची लाखमोलाची संधी गमवू नका!