Income Tax : आयकर वाचवायचा आहे? तर लवकरात लवकर करा 'ही' कामं
Tax Saving Plans : चालू आर्थिक वर्षात मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर वाचवण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत. कर वाचवायचा असेल तर काही कामं लवकर आवरा. कोणती, ते वाचा सविस्तर
How To Save Income Tax : चालू आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. लवकरच नवीन आर्थिक वर्ष लागू होईल. त्याआधी नागरिकांनी आयकर भरणं आवश्यक आहे. काही लोक आयकर कसा वाचवायचा याचं आधीच नियोजन आणि उपाय करतात. परंतु सर्वच जण या बाबतीत जागरुक नसतात. अनेक जण आयकर वाचवण्याचं नियोजन करणं वारंवार पुढे ढकलत राहतात आणि यामध्ये वेळ निघून जातो. परिणामी त्यांना पूर्ण कर भरावा लागतो. योग्य उपाययोजना आणि नियोजन करुन तुम्ही कर वाचवू शकता. कर भरणं हे प्रत्येक नागरिकाचं महत्त्वाचं कर्तव्य आहे, पण आपलं आर्थिक व्यवस्थापन तसेच कायदेशीर कर-बचत उपायांची अंमलबजावणी करणं देखील महत्त्वाचं आहे. आयकर वाचवायचा असेल तर येथे सांगितलेली कामं करा.
आधार-पॅन लिंक
मार्च महिन्याचा निम्मा महिना उलटून गेला असून चालू आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस उरले आहेत. आर्थिक वर्ष संपताच अनेक नियम बदलतील. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पॅन आणि आधार लिंकिंग. पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. जर तुम्ही मुदतीपूर्वी लिंक केले नाही तर तुमचं पॅन कार्ड वैध राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला ते वापरता येणार नाही. अंतिम मुदतीनंतर आधार-पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये दंड देखील भरावा लागेल.
कर बचत गुंतवणूक
कर वाचवण्यासाठी लोक अनेक प्रकारची गुंतवणूक करतात. याचा पुरावाही करदात्यांना सादर करावा लागतो. तुम्ही गुंतवणूक करून आयकर रिटर्नमध्ये परतावा मागू शकता. यासाठी तुम्हाला 31 मार्चपूर्वी वैध पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची प्राप्तिकर परतावा (Income Tax Return) मिळू शकतं.
ॲडव्हान्स आयकर
ॲडव्हान्स कराचा शेवटचा हफ्ता भरण्याची शेवटची तारीखही जवळ आली आहे. तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्सचा शेवटचा आणि चौथा हफ्ता 15 मार्च 2023 पर्यंत भरावा लागेल. ॲडव्हान्स टॅक्स भरणाऱ्यांच्या श्रेणीत येणाऱ्या करदात्यांनी अंतिम मुदतीपूर्वी तो भरणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना दंड भरावा लागू शकतो. ज्या करदात्यांना आर्थिक वर्षात कर 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक कर द्यावा लागतो, त्यांना आगाऊ कर म्हणजेच ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो.
ॲडव्हान्स टॅक्स चार हफ्त्यांमध्ये जमा करावा लागतो. पहिला हफ्ता 15 जून, दुसरा 15 सप्टेंबर, तिसरा 15 डिसेंबर आणि शेवटचा हफ्ता 15 मार्चपर्यंत जमा करावा लागतो. तुम्हाला 15 जूनपर्यंत एकूण कराच्या 15 टक्के ॲडव्हान्स टॅक्स म्हणून जमा करावा लागेल. त्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत 45 टक्के, 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्के आणि 15 मार्चपर्यंत 100 टक्के कर भरावा लागेल. तुम्ही अद्याप ॲडव्हान्स टॅक्सचा कोणताही हफ्ता जमा केला नसेल, तर तुम्ही 31 मार्चपर्यंत करु ॲडव्हान्स टॅक्स जमा करु शकता.
अपडेटेड आयकर रिटर्न
वित्त कायदा, 2022 ने नवीन प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची सुविधा देण्यात आली असून याला अपडेटेड रिटर्न (ITR-U) असं नाव देण्यात आलं आहे. यासाठी आयकर कायद्याच्या कलम 139 मध्ये नवीन उपकलम 8(अ) जोडण्यात आलं आहे. तुमच्या जुन्या ITR मध्ये काही चूक किंवा तुम्ही जर कोणतंही उत्पन्न तुम्ही दाखवायला विसरला असाल, तर तुम्ही अपडेटेड रिटर्नचा मार्ग निवडू शकता. याशिवाय, तुम्ही यापूर्वी रिटर्न भरले नसले तरीही, तुम्ही अपडेट केलेले रिटर्न देखील वापरु शकता. अपडेटेड रिटर्न संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून दोन वर्षांपर्यंत दाखल केले जाऊ शकतात. म्हणजेच गेल्या दोन वर्षांचे अपडेट रिटर्न भरण्यासाठी तुमच्याकडे 31 मार्चपर्यंतचा वेळ आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Income Tax: आयकर भरताय? मग नव्या करप्रणालीबाबत या दहा गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात...