Zerodha : कुणीही सहजपणे कर्ज देतंय म्हणून कर्ज घेणं टाळा; 'झिरोधा'च्या नितीन कामत यांच्या गुंतवणुकीच्या चार सोप्या टिप्स
Nithin Kamath : पन्नासाव्या वर्षी निवृत्ती आणि त्यानंतर 80 वर्षापर्यंत उदरनिर्वाह कसा करायचा याबद्दल नितीन कामत यांनी चार सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत.
मुंबई : कर्मचाऱ्यांच्या फिटनेसवर भर देण्यासाठी चर्चेत असलेल्या झिरोधा ऑनलाईन (Zerodha Online) ब्रोकिंग फर्मचे संस्थापक (CEO of Zerodha) नितीन कामत (Nithin Kamath) यांनी गुंतवणुकीसोबतच सुखी आयुष्याचा मंत्र सर्वांना दिलाय. त्यांच्या ट्विटर हँडलवरुन ते नेटिझन्स तसंच आपल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी सतत अशा नवनव्या ऑफर्स जाहीर करत असतात. आता त्यांनी आपल्या ट्विटर थ्रेडमधून जेनरेशन झेड (Generation Z) आणि मिलेनियल्सना (Millennials) असा सुखी आयुष्याचा कानमंत्र दिलाय. जनरेशन झेड म्हणजे सर्वसाधारणपणे नव्या शतकात जन्मलेली पिढी.. म्हणजेच ज्यांचा जन्म 1997 नंतर झाला आहे, असे तरुण.. साधारणपणे 2020 च्या आसपास ही पिढी शिक्षण संपवून कामा-धंद्याला लागलेली असते. तर मिलेनियल्स म्हणजे त्याच्या आधीची पिढी.. आता शिकून सवरुन कामा-धंद्याला लागलेली आणि अपत्य असलेली पिढी. थोडक्यात 1981 ते 1996 च्या दरम्यान जन्म झालेली पिढी. तसंच जेनरेशन एक्स (Generation X) म्हणजे 1965 ते 1980 दरम्यान जन्म झालेली पिढी.
इंटरनेट आणि सोशल मीडियाचा विकास या जेनरेशन झेड पिढीसोबतच झालेला आहे. ही पिढी वर्तमानात जगण्यावर भर देते. सर्वसाधारणपणे ही पिढी भविष्य त्यासाठीचं नियोजन या बाबतीत तुलनेने बेफिकिर असल्याचं मानलं जातं. तसं प्रत्येकाला आधीच्या पिढीला आपल्या नंतरची पिढी ही भविष्याबद्धल बेफिकीर असल्याचं वाटत असतं.
या जनरेशन झेड आणि मिलेनियल्सचं निवृत्तीचं वय कमी झालेलं आहे, या वास्तवाशी काही सोयरसुतक नसल्याचं नितीन कामत यांना वाटतं. गेल्या अनेक पिढ्यांपासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किंवा खाजगी क्षेत्रातही वय वर्षे 58 ते 60 हे नोकरीतून निवृत्तीचं वय समजलं जात आहे. पण हे सार्वकालिक सत्य नसल्याचं नितीन कामत सांगतात. तंत्रज्ञानाच्या अफाट वेगामुळे आणि त्या अनुषंगाने बदललेल्या जीवनशैलीमुळे तसंच वैद्यकीय संशोधनातील क्रांतीमुळे निवृत्तीचं वय कमी होत आहे तर सर्वसाधारण आयुर्मान वाढलेलं आहे. आगामी वीस वर्षांचा विचार केला तर निवृत्तीचं वय 50 पर्यंत खाली आलेलं असेल आणि सरासरी आयुर्मान 80 पर्यंत वाढलेलं असेल.
वेगाने विकसित होणारं तंत्रज्ञान आणि बदलणारी जीवनशैली यामुळे वय वर्षे 50 नंतर ही पिढी आता करत असलेलं काम करण्यास सक्षम असेलच असं नाही. तसंच वैद्यकीय संशोधनामुळे सर्वसाधारण आयुर्मान वाढलेलं आहे. त्यामुळे नोकरीतून, उदरनिर्वाहाच्या व्यवसायातून पन्नासाव्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर पुढची वीस वर्षे उदरनिर्वाहासाठी काय करायचं याचं नियोजन ही पिढी फारसं करत नाही, कारण त्यांना वर्तमानात जगणं आवडत असतं.
What Gen Z & even millennials don't think about enough is that the retirement age is dropping fast due to technological progress & life expectancy going up due to medical progress.
— Nithin Kamath (@Nithin0dha) October 29, 2022
In 20 years, retirement could be at 50 & life expectancy at 80. How do you fund the 30 years? 1/5
पन्नासाव्या वर्षी निवृत्ती आणि त्यानंतर वाढलेल्या वय वर्षे 80 पर्यंतच्या आयुर्मानामुळे नोकरी नसलेल्या वीस वर्षांचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न झिरोधाचे नितीन कामत यांनी उपस्थित करत या जनरेशन झेड आणि मिलेनियल्स पिढीसोबत काही चांगल्या टिप्स शेअर केल्या आहेत.
जर वातावरण बदलामुळे म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग किंवा अन्य कोणत्याही कारणाने आपण सर्व निवृत्तीच्या कमी झालेल्या वयापूर्वी देवाघरी गेलो नाही तर भविष्यात निवृत्ती संघर्ष ही खूप मोठी समस्या असणार आहे, असं नितीन कामत सांगतात. आगामी पंचवीस वर्षातच हा जगातील अनेक देशांपुढील एक मोठा प्रश्न असू शकतो. आपल्या आधीच्या पिढ्या याबाबतीत बऱ्याच सुदैवी होत्या, कारण त्यांच्या काळात आयुर्मान वाढलेलं नव्हतं. तसंच त्यांनी वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या साधनांचा योग्य वापर करुन निवृत्तीनंतरच्या काळासाठी मोठं संचित गाठी बांधलेलं असायचं. त्यात प्रामुख्याने रियल इस्टेट, शेत-जमिनींमधील गुंतवणूक किंवा शेअरमार्केटमध्ये करुन ठेवलली गुंतवणूक वगैरे बाबींचा समावेश होता. पण आता रियल इस्टेटमधील गुंतवणूक भविष्यात आपल्या आधीच्या पिढीला मिळाला एवढा परतावा देईल याची खात्री नाही.
मग अशावेळी काय करायचं? यासाठीच झिरोधाच्या नितीन कामत यांनी चार सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत. ते सांगतात
1. कुणीही सहजपणे कर्ज देतंय म्हणून कर्ज घेणं टाळा आणि कर्ज घेऊन दीर्घकालीन गरजेच्या नसतील अशा वस्तूंची खरेदी करु नका. ज्या वस्तूंची किंमत सातत्याने कमी होत जाणार आहे किंवा दरवर्षीच्या वापराने घसारा घट होणार आहे, त्याची खरेदी बंद करायला हवी.
So,
— Nithin Kamath (@Nithin0dha) October 29, 2022
1. Stop getting triggered by everyone trying to lend & stop borrowing to buy things you don't need or depreciate in value.
2. Start saving early. Diversify across FDs/G-Secs & SIPs of Index funds/ETFs. Stocks are probably still the best bet to beat inflation long term. 3/5
2. लवकरात लवकर म्हणजे कमाईला सुरवात केल्याबरोबर लगेच बचतीला सुरुवात करा. तसंच बचत आणि गुंतवणुकीत वैविध्य ठेवा म्हणजे सर्व बचत एकाच ठिकाणी गुंतवून न ठेवता, मुदत ठेव, सरकारी रोखे, इंडेक्स फंडाच्या एसआयपी, ईटीएफ असे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आहेत. अजूनही महागाई किंवा चलनवाढ यामुळे गुंतवणुकीत मिळालेला परतावा जिरवायचा नसेल तर शेअर मार्केटमधील वेगवेगळ्या पर्यायांमधील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी चांगली गुंतवणूक आहे.
3. लवकरात लवकर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी चांगली हेल्थ पॉलिसीचं संरक्षण घ्या. कधी कधी तुमचं किंवा कुटुंबातील कुणाही एखाद्याचं आजारपण तुमची सर्व बचत संपवून तुम्हाला कर्जबाजारी करायला पुरेसं असतं. अशा प्रासंगिक आघातामुळे तुम्ही खूप माहे ढकलला जाता. कोणतीही नोकरी पूर्णकालीक म्हणजे तुमच्या निवृत्त होण्याच्या वयापर्यंत टिकेल याची खात्री नसते. म्हणूनच तुम्ही काम करत असलेल्या कंपनीकडून तुम्हाला मिळत असलेल्या हेल्थ पॉलिसीशिवाय तुम्ही एक वेगळी हेल्थ पॉलिसी घेऊन ठेवली पाहिजे. तुमची नोकरी गेल्यानंतर तुम्हाला नोकरीत असलेल्या हेल्थ पॉलिसीचं संरक्षण उरणार नाही आणि त्यावेळी मार्केटमधून नवी पॉलिसी घेणं खूप महाग असेल.
3. Get a comprehensive health insurance policy for yourself & everyone in the family. One health incident is enough to push most people into financial ruin or set them back many years financially. Jobs don't last forever, hence one policy outside of what is provided at work. 4/5
— Nithin Kamath (@Nithin0dha) October 29, 2022
4. जर तुमच्या कुटुंबात तुमच्यावर अवलंबून असलेलं कुणी असेल तर आताच तुमची एक टर्म पॉलिसी घेऊन ठेवा. म्हणजे तुम्हाला काही झालं तर तुमच्यावर अवलंबून असणारे तुमचे कुटुंबीय उघड्यावर येणार नाहीत. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल एवढ्या रकमेची टर्म पॉलिसी आताच घेऊन ठेवा.
या चार सोप्या टिप्स दिल्यानंतर नितीन कामत सांगतात की सर्वात महत्वाचं म्हणजे कर्ज घेणं थांबवा..
4. If you have dependents, they should be covered if something happens to you. Buy a term policy with adequate cover. In the worst case, this money in a bank FD should cover their financial needs.
— Nithin Kamath (@Nithin0dha) October 29, 2022
But the biggest fix for most people is that they should stop taking loans! 5/5
झिरोधाचे नितीन आणि निखिल कामत या दोन बंधूंनी अल्पावधीत त्यांची झिरोधा ऑनलाईन ही ब्रोकिंग फर्म नावारुपाला आणलीय. दोन वर्षांपूर्वी कामत बंधूचा हारुन इंडियाच्या यादीत चाळीस वर्षाखालील वयोगटातील अब्जाधीश म्हणून समावेश झाला आहे. त्यांनी फक्त त्यांची ब्रोकिंग फर्म सुरु करुन गुंतवणूकदारांचा फायदा करुन दिलेला नाही तर त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठीही ते नियमित वेगवेगळ्या आरोग्याधारित योजना जाहीर करत असतात. एप्रिलमध्ये वार्षिक अप्रायजलच्या वेळी त्यांनी वजन कमी करा आणि पंधरा दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळवा अशी योजना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी दररोज 350 कॅलरीज बर्न करा आणि एक महिन्याचा वाढीव पगार मिळवा अशी अभिनव ऑफरही लागू केली होती.