कांद्याला झळाळी! दरात झाली वाढ, कोणत्या बाजारात किती दर?
सध्या कांद्याच्या दरात (Onion Price)वाढ होताना दिसत आहे. अनेक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाल्यानं दरात वाढ झाली आहे.
Onion Price News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Farmers) दिलासा देणारी बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात (Onion Price)वाढ होताना दिसत आहे. अनेक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाल्यानं दरात वाढ झाली आहे. काल (5 जून रोजी) सोलापुरात कांद्याला विक्रमी दर मिळाला. सोलापुरात (Solapur) कांद्याची घाऊक किंमत 33 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. मात्र, बंदी उठवताना काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. त्यामुळं कांद्याचे दर कमीच होते. मात्र, बऱ्याच दिवसानंत आता कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अनेक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाली आहे. याचा परिणाम कांद्याच्या दरावर दिसून आला आहे. अनेक ठिकाणी कांद्याच्या दरात चांगली वाढ झालीय. सध्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे.
आवक कमी झाल्यानं कांद्याच्या दरात वाढ
मिळालेल्या माहितीनुसार काही बाजारात कांद्याची किमान घाऊक किंमत 20 रुपये किलोच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या म्हणण्यानुसार, 5 जून रोजी राज्यातील 43 पैकी 40 बाजार समित्यांमध्ये कांद्याची कमाल घाऊक किंमत 20 रुपये प्रति किलोच्या वर होती. दरम्यान, नुकत्याचा झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांद्यानं मोठं मार्केट खाल्ले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. केंद्र सरकारने 4 मे रोजी कांदा निर्यातबंदी पाच महिन्यांनी संपवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा बाजारात कांद्याचे भाव खूपच कमी होते. आता कांद्याची निर्यात होऊ लागली आहे, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील आवक लक्षणीय घटली आहे. आता आवक कमी झाल्याने भाव वाढत आहेत.
कोणत्या बाजारात कांद्याला किती दर मिळाला?
पुणे बाजारात कांद्याला सरासरी दर हा 1600 ते 2000 रुपयांच्या आसपास आहे.
इस्लामपूर बाजारात कांद्याला1500 रुपये ते कमाल 3000 रुपयांचा दर आहे.
चंद्रपुरात 1300 रुपये ते 2500 रुपये प्रतिक्विंटल.
सातारा 2000 रुपये ते 2500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
मतपेटीतून शेतकऱ्यांनी सरकारविरोधी रोष केला व्यक्त
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केलाय. कांदा उत्पादक पट्ट्यात महायुतीचे जे उमेदवार उभा होते, त्या उमेदवारांच्या विरोधात शेतकऱ्यांनी मतदान केले. परिणामी कांदा उत्पादक पट्ट्यातील मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. यामध्ये नाशिक, दिंडोरी, अहमदनगर, शिर्डी, शिरुर, धुळे, नंदुरबार या मतादरसंघाचा समावेश आहे. या सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
महत्वाच्या बातम्या: