(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कांद्यानं केला करेक्ट कार्यक्रम! शेतकऱ्यांनी 7 जणांना दाखवलं आस्मान, निर्यातबंदीचा महायुतीला फटका
Loksabha Election Result 2024 : कांदा उत्पादक पट्ट्यात महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महायुतीच्या विरोधात मतदान केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
Loksabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांचे सर्व निकाल (Loksabha Election Result) हाती आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारलीय. त्यांना 30 जागांवर यश मिळालं आहे. अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दरम्यान, या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या (Farmers) आक्रोशाचा मोठा फटका भाजपला बसला आहे. विशेषत: कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Onion Farmers) भाजपच्या विरोधात मतदान केल्यानं अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र, शेतकऱ्यांचा कांदा बाजारात आला की सरकारच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. वाढलेले दर कमी होतात. यावर्षी देखील तसच झालं. कांद्याचे दर वाढले की सरकारनं कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळं कांद्याचे दर खूप कमी झाले, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले होते. सरकारच्या या धोरणाचा शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला होता. शेतकऱ्यांचा हाच रोष लोकसभा निवडणुकीत कांदा पट्ट्यात पाहायला मिळाला. कांदा पट्ट्यातील खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जाणून घेऊयात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कोण कोणत्या उमेदवारांना पराभवाचा धक्का दिला आहे.
'या' कांदा पट्ट्यातील उमेदवारांना बसला पराभवाचा धक्का
1) भारती पवार (दिंडोरी) - पराभूत
2) हेमंत गोडसे (नाशिक) - पराभूत
3) हिना गावित (नंदुरबार) - पराभूत
4) सुजय विखे पाटील (अहमदनगर दक्षिण) - पराभूत
5) सुभाष भामरे (धुळे) - पराभूत
6) शिवाजीराव अढळराव पाटील (शिरुर) - पराभुत
7) सदाशिव लोखंडे (शिर्डी) - पराभुत
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कांद्याचं क्षेत्र
या सर्व लोकसभा मतदारसंघात महायुतीला पराभवाचा धक्का बसला आहे. विशेषत:नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व या भारती पवार करत होत्या. त्या केंद्रीय राज्यमंत्री देखील होत्या. मात्र, यावेळी जनतेनं त्यांना नाकारलं आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कांद्याचे क्षेत्र आहे. यामध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघ, कळवण विधानसभा मतदारसंघ, चांदवड विधानसभा मतदारसंघ, येवला विधानसभा मतदारसंघ, निफाड विधानसभा मतदारसंघ, दिंडोरी विधानसभा मतदारसंघ याचा समावेश होतो. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होतं. तसेच याठिकाणी कांद्याच्या मोठ्या बाजारपेठा देखील आहेत. कोट्याधी रुपयांची उलाढाल याठिकाणी होत असते. मात्र, सरकारनं कांदा निर्यातबंदी केल्याचा मोठा फटका या मतदारसंघात भारती पवार यांना बसला. शेतकऱ्यांनी त्यांच्याएवजी लोकांनी शरद पवार गटाचे भास्कर भररे यांना निवडून दिलं.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघासोबतच नाशिक लोकसभा मतादरसंघातही मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. या मतदारसंघात देखील महायुतीचे उेदवार हेमतं गोडसेंना पराभवाचा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गोडसे यांच्या विरोधात मतदान केले. याचा फटका त्यांना बसला आहे.
नंदुरबार धुळे अहमदनगर, शिर्डी या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना फटका
नंदुरबार, धुळे, अहमदनगर या मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. यावेळी या शेतकऱ्यांनी देखील विद्यमान खासदारांना आस्मान दाखवलं आहे. नंदुरबारमध्ये हिना गावित यांचा पराभव झाला आहे. तर धुळ्यात डॉ. सुभाष भामरे यांचा तर अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का
शिरुर लोकसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महायुतीच्या विरोधात मतदान केले. .या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला आहे.
महत्वाच्या बातम्या: