आता फ्रान्समध्येही अंबानींचा बोलबाला, नीता अंबानींच्या खांद्यावर ऑलिम्पिकची मोठी जबाबदारी!
सध्या जगभरात पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकची चर्चा आहे. दरम्यान, नीता अंबानी यांना ऑलिम्पिक समितीने मोठी जबाबदारी दिली आहे.
Nita Ambani Re-elected as IOC Member: उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या लग्नामुळे गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंब चांगलेच चर्चेत होते. या लग्नसोहळ्यात खर्च करण्यात आलेले पैसे, पाहुण्यांच्या पाहुणचाराची करण्यात आलेली सोय यामुळे हे लग्न सर्वांसाठी आकर्षण ठरले होते. सध्या अंबानी कुटुंबातील नीता अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांची आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य म्हणून पुन्हा एकदा निवड झाली आहे. रिलायन्स फाऊंडेशनने समाजमाध्यमावर अधिकृतपणे तशी माहिती दिली आहे.
नीता अंबानी यांच्याकडे मोठी जबाबदारी
सध्या जगभरात पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेची चर्चा आहे. या स्पर्धेत भारत कशी कामगिरी करणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नीता अंबानी चर्चेत आल्या आहेत. त्यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) सदस्य म्हणून पुन्हा एकदा निवड झाली आहे. त्यांची सर्वप्रथम 2016 साली रिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान आयओसीच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा या समितीच्या सदस्य होण्याचा सन्मान नीता अंबानी यांना मिळाला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य होण्यासाठी त्यांना सर्व 93 मतदारांनी पाठिंबा दिला.
समाजमाध्यमावर अधिकृत घोषणा
रिलायन्स फाऊंडेशनने आपल्या समाजमाध्यम खात्यावर या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे. नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. "आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर पुन्हा एकदा निवड झाल्यामुळे मला फार सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. राष्ट्रपती थॉमस बाक आणि आयओसीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या आनंदाच्या आणि अभिमानाच्या क्षणाला भारतीय नागरिकांसोबत शेअर करायचे आहे. भारत तसेच जगभरात ऑलिम्पिकचा आणखी प्रचार आणि ऑलिम्पिकच्या मजबुतीकरणाच्या प्रयत्नांना कायम ठेवण्यासाठी मी तत्पर आहे," अशा भावना नीता अंबानी यांनी व्यक्त केल्या आहेत.
वेगवेगळ्या खेळांत गुंतवणूक
नीता अंबानी या आयपीएलमधील सर्वाधिक प्रसिद्ध संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स या संघाच्या मालकीण आहेत. त्या फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. या संस्थेकडून इंडियन सुपर लीगचे (ISL) आयोजन केले जाते. मुंबई इंडियन्स या संघासह त्या मुंबई एमआय केप टाउन (2022), एमआय अमिरात (2022) आणि मुंबई इंडियन्स महिला संघाच्या (2023) सह-मालकीण आहेत.
हेही वाचा :
Kisan Credit Card: 'या' शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण...