सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी, गुंतवणूकदारांचं एकाच झटक्यात मोठं नुकसान, खरेदीदारांसाठी मात्र मोठी संधी
अर्थसंकल्पात सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचाी घोषणा केली आहे. त्यामुळं सोन्याच्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Union Budget News: अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचाी घोषणा केली आहे. त्यामुळं सोन्याच्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोन्याचे दर कमी झाल्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
अर्थसंकल्पाने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा बदल घडवून आणला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्वेलर्सच्या जुन्या मागणीनंतर सोने आणि इतर काही मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव दिला. या निर्णयाचा जनतेवर दुहेरी परिणाम होत आहे. एकीकडे असे लोक आहेत जे सोने खरेदीच्या तयारीत होते, त्यांना मोठा फायदा झाला आहे. मात्र, दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली होती, त्यांचे नुकसान झाले आहे.
सराफा व्यापाऱ्यांची मागणी पूर्ण
मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, पण दागिने आणि सराफा व्यावसायिकांची एक जुनी मागणी या अर्थसंकल्पात नक्कीच पूर्ण झाली. सोने-चांदी इत्यादींवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची मागणी सराफा व्यापारी करत होते. अर्थमंत्र्यांनी त्यांची मागणी पूर्ण केली.
सोन्यावरील कस्टम ड्युटी 6 टक्के करण्याची घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना सोन्यावरील कस्टम ड्युटी 6 टक्के करण्याची घोषणा केली. सध्या सोन्यावरील कस्टम ड्युटीचा प्रभावी दर 15 टक्के आहे. म्हणजेच अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी 9 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चांदीवरील कस्टम ड्युटीही 15 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आली आहे. सोने-चांदीशिवाय प्लॅटिनमवरही कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पानंतर सोने खूप स्वस्त
अर्थसंकल्पीय घोषणेचा परिणाम बाजारावर लगेच दिसून येत आहे. MCX वर आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गुरुवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात, एमसीएक्सवर सोने 1.5 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 1,159 रुपयांनी घसरून 67,993 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. मंगळवारी अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या दरात 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती.
सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता
अर्थसंकल्पापूर्वी सोन्याचा भाव 72 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर होता, तो आता 68 हजार रुपयांवर आला आहे. म्हणजेच अर्थसंकल्पापासून सोने प्रति 10 ग्रॅम 4 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे की बजेटमध्ये कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्याने सोन्याच्या किमतीवर 6 हजार रुपयांपर्यंत परिणाम होऊ शकतो. याचा अर्थ आता सोने प्रति 10 ग्रॅम 2 हजार रुपयांनी स्वस्त होऊ शकते.
सोने खरेदीदारांसाठी मोठी संधी
सोन्याच्या किमतीतील या कपातीमुळे संभाव्य खरेदीदारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. तर जुन्या गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. देशातील अनेकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते. अर्थसंकल्पापूर्वी सोने विक्रमी उच्चांकी पातळीवर होते. यावर्षी सोन्याच्या किमतीत 7-8 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. याचा अर्थ असा की, ज्या सोन्याच्या गुंतवणूकदारांनी या वर्षी आतापर्यंत 7-8 टक्के नफा कमावला होता. त्यांचे मार्जिन आता निम्म्याहून कमी झाले आहे. याचा परिणाम सर्व गुंतवणूकदारांच्या सोन्याच्या होल्डिंगच्या मूल्यावरही झाला आहे.
सार्वभौम सुवर्ण रोख्यांवर परिणाम
अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्याच्या घोषणेनंतर सार्वभौम सुवर्ण रोख्यांवर परिणाम झाला असून ते कमी किमतीत व्यवहार करत आहेत. NSE वर सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या किमतींमध्ये 5 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून येत आहे. SGB ऑगस्ट 2024 करार (SGB AUG24) बजेटनंतर 3 टक्क्यांहून अधिक घसरला आहे आणि 7,275 रुपये प्रति युनिटच्या जवळ व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे, SGB डिसेंबर करार (SGB DEC25) सुमारे 6 टक्के तोट्यासह 7,500 रुपये आहे.
सध्याची बाजाराची स्थिती पाहता सोन्याच्या गुंतवणूकदारांचे हे नुकसान तात्पुरते असल्याचे दिसते. सोन्यावरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणली तरी जीएसटी कौन्सिल जीएसटी दर 3 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.