Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणमध्ये कोणताही बदल नाही, किती महिलांना 500 रुपये मिळणार ते सांगत आदिती तटकरेंचा विरोधकांवर पलटवार
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या लाभार्थी महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. यावरुन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता.

मुंबई : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सुरु असलेल्या चर्चांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नमो शेतकरी महानस्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार दरमहा 500 रुपये मिळणार आहेत. योजनेच्या नियमात कोणताही बदल केलेला नाही, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सुरु असलेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे. त्यांनी सरकारची बाजू मांडली आहे. त्या म्हणाल्या," दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.
त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 774148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.
एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे, किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे.
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी… pic.twitter.com/485UFXrRiq
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) April 15, 2025
माझ्या लाडक्या बहिणींची किंमत पैशात होऊ शकत नाही : मंत्री शंभूराज देसाई
आमच्या लाडक्या बहिणीची 1500 रुपये सुद्धा किंमत होऊ शकत नाही अन् 5 लाख रुपये पण किंमत होऊ शकत नाही. माझ्या लाडक्या बहिणींची किंमत पैशात होऊ शकत नाही. जे 1500 रु. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दिले. ते महिलाना भाऊबीज - रक्षाबंधन भेट म्हणून दिले ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच्या सरकारने ही योजना चालू केली.या योजनेच्या पैशांचं मोल रकमेत होऊ शकत नाही. संजय राऊत म्हणत असतील 500 रुपये केले का ? 1500 रुपये केले का ? या बद्दलची अधिकृत भूमिका राज्य सरकाने घेतली नाही अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

























