Adani Group : अडचणीत अडकलेल्या अदानी समूहाला मिळाली गुड न्यूज! दोन कंपन्यांच्या शेअर दरात उसळण
Adani Group News : मागील काही दिवसांपासून अडचणींचा सामना कराव्या लागलेल्या अदानी समूहाला आज दिलासा मिळाला. फिच आणि मूडीज या रेटिंग एजन्सीने दिलासा दिला. तर, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्टस् च्या शेअर दरात तेजी दिसून आली.
Adani Group News : अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अडचणीत सापडलेल्या अदानी समूहाला (Adani Group) आज मोठा दिलासा मिळाला आहे. क्रेडिट सुईस आणि सिटी ग्रुपने अदानींच्या बाँडवर कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर त्याचे पडसाद बाजारातही उमटले. मात्र, आज दोन जागतिक रेटिंग कंपन्यांनी अदानी समूहाला दिलासा देणारी बातमी दिल्यानंतर अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises) शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसने नीचांकी पातळीवरून उसळण घेतली.
फिच रेटिंग्स आणि मूडीज या जागतिक पातळीवरील रेंटिंग कंपन्यांनी म्हटले की, अदानी समूहाच्या सध्याच्या स्थितीमुळे त्यांच्या रेटिंग्सवर कोणताही परिणाम होणार नाही. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरावर आमची नजर असल्याचेही त्यांनी सांगितले. अदानी समूहाच्या रेटिंगमध्ये बदल करायचा असल्यास त्याच्या सर्व पैलूंचा अभ्यास केला जाईल. त्याशिवाय, कोणताही बदल केला जाणार नाही असेही फिच आणि मूडीजने म्हटले.
आताच रेटिंग्स नाही बदलणार - फिच
फिच रेटिंग्सने शुक्रवारी म्हटले की, अदानी समूहावर गैरव्यवहार करणाऱ्या हेडिंगबर्ग फर्मच्या रिपोर्टमुळे अदानी समुहातील कंपन्या आणि त्यांच्या शेअर्सच्या रेटिंगवर तात्काळ कोणताही प्रभाव पडणार नाही. अंदाजित कॅश फ्लोमध्ये कणाताही मोठा बदल होणार नाही, असा अंदाजही रेटिंग एजन्सीने व्यक्त केला.
अदानी समूहाला आणखी दोन वर्ष अडचण?
Moody's Investors Service या एजन्सीने म्हटले की, अदानी समूहातील कंपन्यांच्या आर्थिक लवचिकतेबाबत अभ्यास सुरू असल्याचे म्हटले. हिंडेनबर्ग अहवालामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत अदानी समूहाच्या कंपन्यांना त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी एक किंवा दोन वर्षांसाठी निधी उभारणे कठीण जाईल. ते म्हणाले की अदानी समूहाला भांडवली खर्च किंवा कर्ज परतफेडीसाठी निधीची आवश्यकता असेल, असेही कंपनीने म्हटले.
अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात तेजी
मागील काही दिवसांपासून अडचणींचा सामना करणाऱ्या अदानी समूहासाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात तेजी दिसून आली. आज अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 1,490.00 रुपयांवर खुला झाला. त्यानंतर शेअर दरात घसरण दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दराने 1017.45 रुपयांचा नीचांक गाठला. हा 52 आठवड्यातील नीचांक ठरला. त्यानंतर खरेदीचा जोर दिसून आल्याने शेअर वधारला. आज, दिवसभरात 1,679.90 रुपयांचा उच्चांक गाठला. आज बाजार बंद झाला तेव्हा अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 1,531.00 अंकांवर स्थिरावला.
अदानी पोर्टसच्या (Adani Ports and Special Economic Zone) शेअर दरात आज तेजी दिसून आली. अदानी पोर्ट्सच्या शेअर 459 रुपयांवर खुला झाला. त्यानंतर घसरण सुरू झाली होती. अदानी पोर्टसने 395.10 रुपयांचा नीचांक गाठला. हा 52 आठवड्यातील नीचांक होता. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने शेअर दरात उसळण दिसून आली. आज बाजार बंद झाला तेव्हा अदानी पोर्टसचा शेअर 5.61 टक्क्यांनी वधारत 488.40 रुपयांवर स्थिरावला. तर, अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन या कंपन्यांच्या शेअर्सला लोअर सर्किट लागले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: