Recession: जगातील इतर देशांप्रमाणे भारतावरही मंदीचे सावट? जाणून घ्या
Recession In India: जगातील अनेक देशांचा जीडीपी घसरत असल्याने आर्थिक मंदीची चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत भारतातही मंदी येईल का ही चिंता अनेकांना ग्रासली आहे.
Recession In India: जगातील अनेक देशांचा आर्थिक विकास दर घसरत असल्याचे चित्र आहे. जीडीपीच्या घसरत्या आकड्यांमुळे (GDP Fallen) आर्थिक मंदीचे संकट गडद होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सातत्याने तिमाहीत जीडीपी दरात घट होणे हे मंदीचे (Recession ) सावट गडद होत असल्याचे लक्षण समजले जाते.
अमेरिकेत मंदी का?
जागतिक आर्थिक महासत्ता असलेली अमेरिका आर्थिक मंदीत जात असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमेरिकेवर ही परिस्थिती का ओढावली हे जाणून घ्यायला हवं, असे 'तेजी-मंदी'चे (Teji Mandi) संस्थापक वैभव अग्रवाल यांनी सांगितले. अमेरिकेने कोरोना महासाथीच्या काळात अधिक चलनी नोटा छापल्या होत्या. त्याच्या परिणामी अमेरिकेत आर्थिक तरलता अधिक झाली. त्यामुळे अमेरिकन नागरिकांच्या क्रय शक्तीत वाढ झाली. त्यामुळे मागणी वाढली. मात्र, पुरवठा त्यादृष्टीने कमी राहिला होता. मागणी आणि पुरवठ्यातील व्यस्त प्रमाणांमुळे महागाई अधिक वाढली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय, अमेरिकन सरकार गॅस टॅक्स हॉलिडे देखील लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे गॅसोलिनच्या किंमतीत घट होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अर्थव्यवस्थेतील अतिरिक्त तरलता काढून टाकण्यासाठी अशा विविध उपाययोजना राबवल्या जातात. याचा अर्थ नागरिकांकडे खर्च करण्यासाठी फारसा पैसा राहणार नाही. दुसरीकडे, आर्थिक तरलतेच्या अभावामुळे कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेतही अडथळा येतो. या सर्वांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत घसरण होईल आणि शेवटी मंदी येऊ शकते, असे वैभव अग्रवाल यांनी सांगितले.
भारतीय अर्थव्यवस्थेवरही मंदीचे सावट?
अमेरिकेत मंदीचे सावट दिसत असताना दुसरीकडे भारतावरही मंदीचे सावट आहे का, यावर चर्चा सुरू आहे. कोरोना महासाथीच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर मंदीचा सामना करावा लागला. वर्ष 2008 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेला महासाथीच्या दरम्यान मंदीचा सामना करावा लागला. मात्र, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटाका हा भारतापेक्षा मोठा होता. त्यामुळे अमेरिकेच्या तुलनेत भारताच्या जीडीपीचा दर चांगला असल्याचे म्हटले जात आहे.
आर्थिक मंदी हे अर्थव्यवस्थेच्या चक्रातील एक भाग आहे. त्यामुळे दीर्घकाळ गुतंवणूकदारांसाठी आर्थिक मंदी ही एक चांगली संधी असते. चांगल्या कंपनींचे शेअर्स तुम्हाला स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी असते असेही अग्रवाल यांनी सांगितले. जगात आर्थिक मंदी सुरू असताना भारतावरही त्याचे सावट पडणार. भारत त्याला अपवाद ठरू शकत नाही. भारताच्या जीडीपीत घसरण होईल. मात्र, अमेरिकेपेक्षा कमी फटका बसेल असा अंदाजही अग्रवाल यांनी वर्तवला.