Share Market Update : शेअर बाजारात घसरणीचं सत्र कायम, भारतातील गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपये बुडाले, कारण समोर
Stock Market Update: विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील त्यांच्या समभागांची विक्री केल्यानं घसरणीचं सत्र पाहायला मिळालं. गेल्या दीड महिन्यात विदेश गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 1.50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.
Stock Market Closing On 12 November 2024 मुंबई : भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं सत्र काही थांबत नसल्याचं चित्र आहे. आज शेअर बाजार सकाळी तेजीसह खुला झाला होता. मात्र, दिवसभरातील ट्रेडिंग दरम्यान बँकिंग, एफएमसीजी, ऑटो आणि एनर्जी क्षेत्रातील शेअर्सची जोरदार विक्री झाली. त्यामुळं शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 79 हजारांच्या घाली घसरला तर निफ्टी 24 हजारांच्या खाली आली. आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा 821 अंकांच्या घसरणीसह बीईएसई सेन्सेक्स 78675 वर बंद झाला. तर , नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टीमध्ये 257 अंकांची घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 23883 अंकावर बंद झाली.
गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण होत असल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 436.59 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. जे सोमवारी 442.54 लाख कोटी रुपये इतकं होतं. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 5.95 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
आज शेअर बाजारामध्ये सर्वाधिक घसरण बँकिंग, एफएमसीजी, ऑटो, फार्मा, मेटल्स, एनर्जी, हेल्थकेअर, ऑईल आणि गॅस या क्षेत्रातील कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. आयटी आणि रिअल इस्टेट स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टी मिडकॅफ आणि निफ्टी स्मॉलकॅफमध्ये घसरण झाली.
बीएसईवर एकूण 4061 शेअरच्या ट्रेडिंग पैकी 1234 शेअर्स तेजीसह तर 2731 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 291 कंपन्यांच्या शेअरमध्ये अपर सर्किट लागलं तर 363 शेअरमध्ये लोअर सर्किट लागलं.सेन्सेक्सवरील 30 पैकी केवळ 4 कंपन्या तेजीत तर 26 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. सन फार्मा 0.28 टक्के, इन्फोसिस 0.06 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.04 टक्के आणि रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी होती. तर, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.
भारतीय शेअर बाजारात घसरण का?
गेल्या दीड महिन्यांपासून विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात विविध कंपन्यांमध्ये गुंतवलेली रक्कम काढून घेतली आहे. गेल्या दीड महिन्यात जवळपास दीड लाख कोटी रुपये विदेश गुंतवणूकदारांनी काढून घेतले असून त्यांचा कल चीनमध्ये पैसे गुंतवण्याकडे वाढला आहे. याशिवाय अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाचा फार परिणाम भारतीय शेअर बाजारात प्रभावी ठरला नाही.
इतर बातम्या :