Devendra Fadnavis : मला टार्गेट करण्यासाठी नागपूरला बदनाम करू नका; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना खडे बोल, म्हणाले....
नागपूरात सुरक्षेचा लोकांचा परसेप्शन काय आहे हेही विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे. विरोधकांना विनंती राहील की त्यांनी नागपूरला बदनाम करू नये. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडे बोल सुनावलेत.
नागपूर: मी मुख्यमंत्री झाल्यावर गुन्ह्यांच्या सर्व घटना नागपुरताच घडतात, असे सांगण्याचा प्रयत्न विरोधकांचा असतो. मात्र नागपूरात सुरक्षेचा लोकांचा परसेप्शन काय आहे हेही विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे माझी विरोधकांना विनंती राहील की त्यांनी नागपूरला बदनाम करू नये. नागपूर पोलिसांना ही माझा सांगणं असेल की प्रत्येक गंभीर गुन्ह्याबद्दल ठोस कारवाई केली पाहिजे. अशा सूचना देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरातील प्रेस क्लब मध्ये आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर प्रेस क्लब आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थीत झाले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलंय.
महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर मी अन्याय होऊ दिला नाही
मी पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या. हा मंत्रीही नव्हता, नवखा आहे, मग कारभार कसा करणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचं, सातत्याने विदर्भावरील अन्यायावर बोलणारा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसला की आपल्यावर अन्याय केला. पण पहिल्या पाच वर्षात लोकांच्या लक्षात आले की, आपण विदर्भात खूप काम केले आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय होऊन दिला नाही. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात सिंचनाचे अनेक प्रकल्प पूर्ण केले. पायाभूत क्षेत्रात आपण मोठी भरारी घेतली. राज्याचा उपमुख्यमंत्री असताना आपण ऊर्जा विभागाचा 25 वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. पुढच्या दोन-तीन वर्षात अशी परिस्थिती येईल की, आपण उद्योगासहित सर्वप्रकारच्या वीजेचे दर कमी करु शकतो, अशी व्यवस्था आपण उभारली आहे, असे महत्त्वाचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विदर्भात आता मोठी औद्योगिक इकोसिस्टीम उभी राहील
याशिवाय, आपण राज्यभरात सहा नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे विदर्भातील 10 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे विदर्भाचा कायापालट होणार आहे. हे प्रकल्प अनेक पिढ्यांवर परिणाम करणारे आहेत. गडचिरोली जिल्हा नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया म्हणून उदयाला आले आहे. या भागातील नक्षलवाद कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभी राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ना बीड ना नागपूर? कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले की, पालकमंत्र्याच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर मी बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात. पण माझी स्वतःची इच्छा आहे, गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो, अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या