Morgan Stanley Report: मागील 10 वर्षात भारताचा चेहरामोहरा बदलला; मॉर्गेन स्टॅनलीच्या अहवालात मोदी सरकारचे कौतुक
Morgan Stanley Report: मागील दशकभराच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर बदल झाला असून देशाचा चेहरामोहरा बदलला असल्याचे अमेरिकन कंपनी मॉर्गेन स्टॅनलीने म्हटले आहे.
Morgan Stanley Report PM Modi: मागील 10 वर्षाच्या कार्यकाळात भारतात मोठे बदल झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जागतिक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवण्याकडे वाटचाल करत असल्याचे अमेरिकन ब्रोकरेज कंपनी 'मॉर्गन स्टॅनली'ने (Morgan Stanley Report) आपल्या अहवालात नमूद केले आहे. या अहवालानुसार, भारत हा आशिया (Asia) आणि जगाच्या आर्थिक विकासात (World Economy) महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे.
'इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजी अँड इकॉनॉमिक्स: हाऊ इंडिया हॅज ट्रान्सफॉर्म्ड इन लेस दॅन डीकेड' या शीर्षकाने अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. आगामी दशकभराच्या काळात भारत हा जागतिक विकासातील पाचवा हिस्सा राहणार असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
भारताबाबत विशेषत: परदेशी गुंतवणूकदारांबाबत साशंक असल्याचे म्हटले गेले आहे. भारत ही दुसऱ्या क्रमांकाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे गुंतवणुकदारांचे म्हणणे आहे. परंतु असे असूनही, गेल्या 25 वर्षात अव्वल कामगिरी करणार्या स्टॉक मार्केटमध्ये भारताने आपल्या क्षमतेनुसार कामगिरी केलेली नाही. मात्र, असा दृष्टिकोन भारतात विशेषतः वर्ष 2014 नंतर झालेल्या बदलांकडे दुर्लक्ष करता कामा नये असेही अहवालात नमूद करण्यात आले.
2014 पासून पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारल्यानंतर 10 प्रमुख बदलांची यादी करताना, मॉर्गेन स्टॅनलीने आपल्या अहवालात म्हटले की, भारतातील कॉर्पोरेट कर दर इतर देशांच्या बरोबरीने आणला गेला आहे. याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढत आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात सातत्याने वाढ होत आहे. तसेच, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) टक्केवारीनुसार डिजिटल व्यवहार वाढत आहेत, जे अर्थव्यवस्था सुव्यवस्थित होण्याचे लक्षण आहे, असे मॉर्गेन स्टॅनलीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारत या दशकाच्या अखेरपर्यंत जागतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असून जीडीपी आणि उत्पादनातील वाढ ही भारताच्या जमेची बाजू असणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
भारताची निर्यात बाजारपेठेतला हिस्सा दुप्पट होणार असल्याचा अंदाज आहे. भारताचा निर्यात बाजार हिस्सा हा 2031 पर्यंत 4.5 टक्के इतका होण्याची शक्यता आहे. वर्ष 2021 च्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दोन पट अधिक आहे. भारतात प्रति व्यक्ती उत्पन्न 2200 डॉलर प्रति वर्ष आहे. प्रति वर्ष उत्पन्न 2032 मध्ये जवळपास 5200 डॉलर प्रति वर्ष इतकं होणार असल्याच अंदाज आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे घटक जोखीम पूर्ण
मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेवर काही घटक नकारात्मक परिणाम करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक मंदी, 2024 मधील लोकसभा निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण होणे, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ नसणे आदी घटक भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतात, असे मॉर्गेन स्टॅनलीने म्हटले.