Rice Export: बिगर बासमती तांदळांच्या निर्यातीवर बंदी; दर वाढ झाल्याने केंद्र सरकारचा निर्णय
Rice Export: तांदळाच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवरही होणार आहे.
Rice Export Ban: भारत सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी (Rice Export Ban) घातली आहे. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे. यासंदर्भात शासनाने आदेश जारी केला आहे. मान्सूनच्या उशिरा झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे विशेषतः धानाचे नुकसान लक्षात घेऊन उत्पादनात घट होण्याची भीती असल्याने केंद्र सरकारने ही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तांदळाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे जागतिक बाजारपेठेत तांदळाच्या किंमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. भारत हा तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील प्रमुख निर्यातदार देश आहे.
अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारपेठेत पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारात बिगर बासमती तांदळाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 टक्के निर्यात शुल्कातून मुक्त करून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तांदळाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे, हे सरकारनेच मान्य केले आहे. किरकोळ बाजारात गेल्या वर्षभरात तांदळाच्या किमतीत 11.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर एका महिन्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अन्नधान्यांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर जून महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ झाली असल्याचे दिसून आले. त्यानंतर महागाईवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली. बिगर बासमती तांदूळावरील निर्यात बंदी हा देखील त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.
केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवरही दिसून येणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. तांदळाच्या जागतिक निर्यातीत भारताचा वाटा 40 टक्के आहे. भारताने 2022 मध्ये 56 दक्षलक्ष टन तांदूळ निर्यात केला होता. भारताकडून स्वस्त दरात तांदळाची निर्यात केली जाते. मात्र, हमीभाव जाहीर झाल्यानंतर भारतातही किंमत वाढली. तर, अन्य पुरवठादारांनी तांदळाचे दर वाढवण्यास सुरुवात केली.
गेल्या वर्षीही सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तसेच पांढऱ्या आणि ब्राऊन तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावले होते. मात्र एल निनोच्या प्रभावाच्या भीतीने तांदळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तांदळाचे भाव वाढू लागले आहेत, अशा परिस्थितीत देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे. गहू आणि साखरेच्या निर्यातीवर आधीच बंदी आहे.