GST Collection: ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी जीएसटी संकलन, महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा
GST Collection : ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनाने एक लाख 50 हजार कोटींचा आकडा ओलांडला आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या कर संकलनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे.
GST Collection : देशात ऑक्टोबर महिन्यातील कर संकलनाबाबत चांगली बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कर संकलनात (GST Collection in October 2022) वाढ झाली आहे. मागील महिन्यात 1,51,718 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले. याआधी एप्रिल महिन्यात सर्वाधिक जीएसटी जमा झाला होता. देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा झाला.
सलग आठव्या महिन्यात देशात जीएसटी 1.4 लाख कोटींहून अधिक जमा झाला आहे. यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा कर संकलनाचा उच्चांक गाठला गेला आहे.
ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कर संकलन 1,51,718 कोटी रुपये इतका आहे. त्यापैकी सीजीएसटी हा 26,039 कोटी रुपये इतका होता. तर, राज्यांच्या वाटा हा 33,396 कोटी रुपयांचा आहे. आयजीएसटी 81,778 कोटी रुपये आहे. यातील 37,297 कोटी रुपये हे आयात करण्यात आलेल्या वस्तूंचे आहे. तर, 10,505 कोटी रुपये हे उपकरातून जमा झाले आहेत. यातील 825 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीतून जमा झाले आहेत.
सप्टेंबर 2022 मध्ये 8.3 कोटी ई-वे बिल जनरेट झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात ई-वे बिल 7.7 कोटी रुपये होते. जीएसटी करात वाढ होणे ही बाजाराच्या दृष्टीने सकारात्मक बाब समजली जाते.
👉 ₹1,51,718 crore gross GST revenue collected for October 2022
— Ministry of Finance (@FinMinIndia) November 1, 2022
👉 2nd highest collection ever, next only to the collection in April 2022
👉 Monthly GST revenues more than ₹1.4 lakh crore for 8 months in a row
Read more ➡️ https://t.co/Bg6Qm1Rgua pic.twitter.com/4Fda1IlAk9
सप्टेंबर महिन्यात कसं होतं जीएसटी संकलन?
सप्टेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलन1.4 लाख कोटींहून अधिक झाले होते. त्यापैकी 25,271 कोटी रुपये सीजीएसटी (CGST) आणि 31,813 कोटी रुपये एसजीएसटी (SGST) कर संकलनातील होते. तर 80,464 कोटी रुपये आयजीएसटी (IGST) इतकी रक्कम जमा झाली. यामध्ये वस्तूंच्या आयातीवर आकारण्यात आलेल्या करातून 41,215 कोटी रुपये जमा झाले.
महाराष्ट्रातून सर्वाधिक कर संकलन
ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक जीएसटी संकलन हे महाराष्ट्रातून झाले. महाराष्ट्रातून 23 हजार 37 कोटींचा जीएसटी जमा झाला. तर, कर्नाटकमधून 10 हजार 996 कोटींचा कर जमा झाला. गुजरात राज्यातून 9469 कोटींचा जीएसटी जमा झाला. उत्तर प्रदेशातून 7839 कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला.