(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Silver Price Today : सोनं 190 रुपयांनी महाग तर चांदी 200 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजच्या किंमती
Gold Silver Price Today : गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमती वाढत असल्याचं दिसत आहे तर चांदीची किंमत घटली असून ती अजूनही 70 हजारांच्या आतच आहे.
मुंबई : सोन्याच्या आणि चांदीच्या भावात किरकोळ चढ उतार कायम राहिले आहेत. बुधवारी संध्याकाळी मार्केट बंद होताना सोन्याच्या किंमतीत 190 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या किंमतीत 200 रुपयांची घट झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,080 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,080 रुपये इतका आहे. तर एक किलो चांदीसाठी आज 69,200 रुपये इतका भाव आहे.
मंगळवारी सोन्याच्या भावात 180 रुपयांची वाढ झाली होती तर काल त्यामध्ये 190 रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळालं होतं. पण येत्या काळात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.
गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. मंगळवारी चांदीच्या भावात 300 रुपयांची वाढ झाली होती तर त्या आधी सोमवारी 200 रुपयांची घट झाली होती. 7 जुलै रोजी चांदीच्या भावाने 70 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
महत्वाच्या बातम्या :