Gold Rate : शेअर बाजारातील घसरणीच्या वेळी सोन्यानं टेन्शन वाढवलं, 300 रुपयांनी सोनं वाढलं, खरेदीचा विचार असेल तर जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव
Gold Rate : भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरातील वाढ काही थांबत नसल्याचं चित्र आहे. सोने खरेदीदारांना दागिने खरेदीसाठी अधिक रक्कम मोजावी लागेल.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु आहे. आज (18 फेब्रुवारी 2025) देखील शेअर बाजारात सेन्सेक्स, निफ्टी 50 आणि बँक निफ्टीमध्ये घसरण सुरु आहे.एकीकडे शेअर बाजारात घसरणीचं चित्र असताना सोने दरात वाढ होत आहे. सोन्यात ज्यांनी गुंतवणूक केलीय त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. मात्र, लग्नसराईच्या निमित्तानं जे सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करु इच्छितात त्यांना मात्र आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो. सोन्याच्या दरात आज देखील वाढ सुरु आहे. मल्टी कमोडिटी एक्सजेंचवर सोन्याच्या दरात 317 रुपयांची वाढ झाली आहे. एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोनं 85372 रुपयांना विकलं जातं आहे.
सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार?
मल्टी कमोडिटी एक्सचेंवर 10 ग्रॅम सोनं 85372 रुपयांवर पोहोचला आहे. हा एमसीएक्सवरील दर असून यामध्ये अशीच वाढ होत राहिल्यास सोनं लवकरचं 90 हजार रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो. चांदीच्या दरात देखील 200 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदी 95800 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळं सोने आणि चांदी येत्या काही दिवसात अनुक्रमे 90 हजार रुपये तर सोनं 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 2900 डॉलर प्रति औसवर आहेत. तर, चांदी 33 डॉलर प्रति औंस आहेत.
दीड महिन्यात सोन्याचे दर 10 हजारांनी वाढले
शेअर बाजारातील घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं. याशिवाय विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी जागतिक अस्थिरच्या काळात सोने खरेदीला प्राधान्य दिल्यानं सोने दरात वाढ होत आहे. 1 जानेवारीला किरकोळ बाजारात सोन्याचा दर 79 हजार रुपयांपर्यंत होता. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात झालेली वाढ लक्षणीय आहे. सोने दरानं 89500 रुपयांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळं येत्या काळात सोने खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागतील.
कोणत्या शहरात किती दर?
नवी दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याचे दर 87100 रुपयांवर आहेत. तर, 22 कॅरेट सोनं 79850 रुपयांना मिळत आहे.
चेन्नईमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 86950 रुपयांवर आहेत. 22 कॅरेट सोनं 79700 रुपयांना मिळत आहे.
बंगळुरुत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 79700 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 86950 रुपये इतका आहे.
मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 79700 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 86950 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकाता अन् पुण्यात देखील मुंबई प्रमाणेच दर आहेत.
इंदोरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 79750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 87000 रुपयांवर पोहोचला आहे.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

