Adani Group: सिमेंट उद्योगात अदानींचा मोठा डाव; आणखी एक सिमेंट कंपनी खरेदी करणार
Adani Group: अदानी समूह आता आणखी एक सिमेंट कंपनी खरेदी करणार आहे. त्यासाठी अदानी समूहाकडून चर्चा सुरू आहे.
Adani Group: अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) आणि एसीसी सिमेंट (ACC Cement) खरेदी केल्यानंतर अदानी समूह (Adani Group) आता आणखी एक कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. गौतम अदानी यांचा अदानी समूह जयप्रकाश एसोसिएट्सच्या मालकीचा सिमेंट उद्योग खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे. 'ब्लूमबर्ग' ने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समूहाची सध्या जयप्रकाश असोसिएट्ससोबत (Jaiprakash Associates) चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा करार जवळपास 50 अब्ज रुपयांचा होणार असल्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या बोलणीत सिमेंट ग्राइंडिंग युनिट आणि जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडच्या लहान मालमत्ता खरेदी करण्याबाबतही चर्चा सुरू आहेत. ही खरेदी अदानी समूहाने नुकत्याच खरेदी केलेल्या सिमेंट कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील काही वर्षात अदानी समूह नवीन उद्योग क्षेत्रात उतरत आहे. त्यासाठी आधीच्या काही कंपन्यादेखील खरेदी करण्यात येत आहे. अदानी समूह हा बंदरे, विमानतळ, वीज, कोळसा आदी विविध क्षेत्रात अग्रसेर आहे.
सिमेंट उद्योगात अदानींचे वर्चस्व?
हा करार झाल्यास अदानी समूह सिमेंट उद्योगात वर्चस्व वाढवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणार आहे. स्विर्त्झलँडमधील कंपनी होल्सिम लिमिटेडकडून अदानी समूहाने काही महिन्यांपूर्वीच एसीसी सिमेंट आणि अंबुजा सिमेंट कंपनी खरेदी केली होती. सिमेंट बाजारपेठेत एसीसी सिमेंटचा मोठा वाटा आहे. या दोन कंपन्या खरेदी केल्यानंतर सिमेंट उद्योगात अदानी समूह दुसऱ्या क्रमांकाची कंपनी झाली. या कंपन्यांची सिमेंट उत्पादन क्षमता 675 लाख टन इतकी आहे.
'ब्लूमबर्ग' कंपनीने अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर, जयप्रकाश एसोसिएट्सकडून माहिती देण्यात आली नाही.
जयप्रकाश एसोसिएट्सच्या शेअर दरात वाढ
अदानीसोबत सुरू असलेल्या चर्चेच्या वृत्तानंतर जयप्रकाश एसोसिएट्सच्या शेअर दरात तेजी दिसून आली आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्सच्या शेअर दरात 3.7 टक्क्यांची तेजी दिसून आली होती.
बिर्ला कंपनीला आव्हान
भारतीय सिमेंट बाजारात सध्या आदित्य बिर्ला समूहाची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी ही मोठी कंपनी आहे. अल्ट्राटेक कंपनीजवळ दरवर्षी 117 दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. Holcim Group च्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड या दोन्हींची संयुक्त क्षमता 66 दशलक्ष टन प्रति वर्ष इतकी आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- OPEC Crude Oil: महागाईचा भडका उडणार? OPEC च्या निर्णयाने इंधन दरात वाढ होण्याची भीती
- लवकरच प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया लॉन्च होणार, पुढच्या वर्षी येणार व्यवहारात - आरबीआयची माहिती