(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adani Cement : अदानींची सिमेंट उद्योगात भक्कम 'पायाभरणी'; सिमेंट कंपन्यांच्या शेअर दरात उसळण
Adani Acquire Ambuja ACC Cements: अदानी उद्योगसमूहाने सिमेंट बाजारपेठेतील अंबुजा आणि एसीसी या कंपन्यांची हिस्सेदारी खरेदी करार केला आहे. या वृत्तानंतर शेअर बाजारात सिमेंट कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
Adani Acquire Ambuja ACC Cements: अदानी समूहाने होल्सीम ग्रुपच्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज शेअर बाजार सिमेंट कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळण दिसून आली आहे. अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंटच्या दरात मोठी तेजी आली आहे.
अदानी समूहाने एसीसी आणि अंबुजा सिमेंट कंपनी 10.5 अब्ज डॉलर म्हणजे 82 हजार कोटी रुपयांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सिमेंट कंपन्यांच्या शेअर दरात उसळण दिसून येत आहे. सकाळी एसीसी सिमेंटचा शेअर दर 4.95 टक्क्यांनी वधारत 2218 रुपयांवर व्यवहार करू लागला. सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास शेअर दर 7.13 टक्क्यांनी वधारत 2263.60 रुपयांवर व्यवहार करत होता. तर, दुसरीकडे अंबुजा सिमेंटमध्येही तेजी दिसून आली. अंबुजा सिमेंट 2.20 टक्क्यांनी वधारत 366.70 रुपयांवर व्यवहार करत होता.
देशातील सिमेंट उद्योगात झालेल्या या मोठ्या कराराचा परिणाम इतर कंपन्यांच्या शेअर दरावर दिसून आला. Heidelberg Cement मध्ये 3.65 टक्क्यांनी वधारला. तर, इंडिया सिमेंट्समध्ये 6.82 टक्क्यांनी वधारत 180 रुपयांवर व्यवहार करत होता. मंगलम सिमेंट्समध्ये 2.24 टक्क्यांची तेजी दिसून आली. जेके लक्ष्मी सिमेंटमध्ये 1.49 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय बिर्ला कॉर्पोरेशनच्या शेअर दरात 2.78 टक्क्यांनी उसळण दिसून आली असून 978 रुपयांवर ट्रे़ड करत आहे.
अदानी समूह होणार दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट्स कंपनी
अंबुजा आणि एसीसी सिमेंट कंपनी खरेदी केल्यानंतर अदानी समूह हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी सिमेंट्स कंपनी झाली आहे. भारतीय सिमेंट बाजारात सध्या आदित्य बिर्ला समूहाची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी ही मोठी कंपनी आहे. अल्ट्राटेक कंपनीजवळ दरवर्षी 117 दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. Holcim Group च्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड या दोन्हींची संयुक्त क्षमता 66 दशलक्ष टन प्रति वर्ष इतकी आहे.
सन 2015 मध्ये स्वित्झर्लंडमधील कंपनी Holcim चे प्रतिस्पर्धी फ्रेंच कंपनी Lafarge सोबत विलीनीकरण झाल्यानंतर LafargeHolcim नावाने सिमेंट आणि इमारत बांधकाम साहित्यातील मोठी युरोपीयन कंपनी तयार झाली होती. मात्र, भारतासह काही आशियाई-युरोपीयन देशांमधील कायद्यांमुळे Holcim Group या नावाने बाजारपेठेत प्रवेश केला होता.