(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Twitter : बॅन अकाऊंटवरील निर्बंध हटवणार? ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांचं स्पष्टीकरण
Elon Musk on Twitter Ban : ट्विटर अकाऊंटवरील बॅन हटवण्याबाबत नवे मालक एलॉन मस्क यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या ट्विटरच्या पॉलिसीमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचं मस्क यांनी सांगितलं आहे.
Elon Musk on Donald Trump : ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. त्यानंतर आता बरेच नियम बदलणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच ट्विटरवरील बॅन केलेल्या अकाऊंटबाबतही अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच अलिकडे प्रसिद्ध झालेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांच्या ट्विटर अकाऊंटवरील बॅन हटवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र ट्विटर अकाऊंटवरील बॅन हटवण्याबाबत नवे मालक एलॉन मस्क यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या ट्विटरच्या पॉलिसीमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचं मस्क यांनी सांगितलं आहे.
ट्विटर कंटेट पॉलिसीमध्ये तूर्तास बदल नाही
ट्विटरचे मालक बनल्यावर मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह तीन बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. यानंतर ट्विटरच्या पॉलिसीमध्येही मस्क यांच्याकडून बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण याबाबत स्पष्टीकरण देत मस्क यांनी ट्विट केलं आहे. मस्क यांनी म्हटलं आहे की, 'स्पष्टपणे सांगायचे तर, आम्ही अद्याप Twitter च्या कंटेट नियंत्रण धोरणांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.'
To be super clear, we have not yet made any changes to Twitter’s content moderation policies https://t.co/k4guTsXOIu
— Elon Musk (@elonmusk) October 29, 2022
ट्रम्प यांच्यावर ट्विटर अकाऊंटवर बंदी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष (US President) निवडणुकीनंतर 6 जानेवारी रोजी अमेरिकेत भडकलेल्या हिंसाचारासाठी माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) दोषी असल्याचा आरोप करत ट्रम्प यांच्या अकाऊंटवर कायमची बंदी घालण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर 88 मिलियन फॉलोअर्स होते. त्यानंतर आता मस्क ट्रम्प यांच्यावरील बंदी हटवणार असल्याची चर्चा होती.
ट्विटरचं पाखरू एलॉन मस्क यांच्या हाती
एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक बनले आहेत. एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्स किमतीला ट्विटर कंपनी खरेदी केली आहे. ट्विटरची मालकी मिळाल्यानंतर मस्क आता अनेक मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मस्क लगेच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
ट्विटरच्या तीन बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी
एलॉन मस्क यांनी ट्विटर (Twitter Deal) खरेदी केल्यानंतर पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांच्यासह तीन बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. ट्विटर डील पूर्ण झाली आहे. ट्विटरचं पाखरू हाती येताच एलॉन मस्क यांनी मोठे बदल केले आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ (CEO - Chief Executive Officer) पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली आहे. इतकंच नाही तर सीएफओ (CFO - Chief Financial Office) नेड सेगल (Ned Segal) यांनाही कामावरून कमी करत, या तिघांनाही कंपनीच्या मुख्य कार्यालयातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.