Twitter कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, आजपासून मस्क यांच्याकडून कर्मचारी कपात करण्यास सुरुवात
Elon Musk : आजपासून ट्विटर कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात झाली आहे. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क येत्या काळात निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या विचारात आहेत.
Layoffs Twitter Employees Begins : जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटर ( Twitter ) खरेदी केल्यानंतर अनेक ट्विटर कर्मचाऱ्यांची ( Twitter Employees ) नोकरी धोक्यात आली आहे. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांच्याकडून आजपासून ट्विटर कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात करणार आहे. ट्विटर कर्मचाऱ्यांना कपातीची माहिती देण्यात आली आहे. ट्विटर प्लॅटफॉर्म फायदेशीर करण्यासाठी नवे मालक एलन मस्क यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवत कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना मेलमध्ये सांगितलं आहे की, 'ट्विटरकडून कर्मचारी कपात करण्यात येत आहे. ट्विटरसाठी आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींवर याचा परिणाम होईल, मात्र कंपनीच्या हिताकरीता हे दुर्दैवी पाऊल उचलावं लागत आहे.'
मस्क निम्मे कर्मचारी हटवण्याच्या तयारीत
ट्विटरची मालकी मिळाल्यानंतर मस्क 75 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं जात होतं. मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या टप्प्यात दोन हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ट्विटरमध्ये एकूण साडे सात हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ट्विटर कर्मचाऱ्यांसाठी असलेले वर्क फ्रॉम एनिवेअर पॉलिसीतही बदल केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येत काम करण्याच्या सूचना मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मेलवर माहिती मिळेल
ट्विटरने कर्मचार्यांना मेल पाठवत कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्राथमिक माहिती दिली आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, शुक्रवारी ( 4 नोव्हेंबर 2022 ) कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मेलवर माहिती मिळेल.
जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विटर डीलसाठी 13 अब्ज डॉलरचं कर्ज घेतल्याचं बोललं जात आहे. कर्जावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी मस्क सुमारे एक अब्ज डॉलरची रक्कम देण्याच्या तयारीत आहेत. ट्विटर कंपनीकडून होणारा फायदा सध्या मजबूत नाही, त्यामुळे खर्चात कपात करण्याचा मोठा निर्णय मस्क यांनी घेतला आहे. त्यामुळे कर्मचारी कपातीमुळे मस्क यांना मोठा फायदा होणार आहे.
ब्लू टिकसाठी रुपये मोजावे लागणार पैसे
ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ब्लू टिकसाठी (Twitter Blue Tick) पैसे आकारण्यात येण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. ब्लू टिकसाठी प्रत्येकाला प्रति महिना आठ डॉलर रुपये (भारतीय किंमतीनुसार 660 रुपये) शुल्क भरावं लागणार असल्याचं मस्क यांनी सांगितलं. प्रत्येक देशाच्या क्षमतेनुसार ब्लू टिकच्या किंमती कमी जास्त असेल.