1 एप्रिलपासून बँकेचे नियम बदलणार, औषधं महागणार, जीएसटीतही बदल; जाणून घ्या काय आहेत 10 मोठे बदल
Changes from 1st April 2022 : आज 1 एप्रिल 2022 पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अनेक बदल होणार आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशांवर होणार आहे.
Changes from 1st April 2022 : आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2022-2023 सुरू झाले आहे. या नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या महिन्यात काही मोठे बदल होणार आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. औषधांचे दर वाढणार असून ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीवर असलेली विशेष सवलतही बंद होणार आहे. इंधन दरवाढीचा चटके सहन करणाऱ्यांना गॅस दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या आजपासून होणारे बदल
1. औषधांचे दर वाढणार
1 एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे 800 औषधांच्या किंमती वाढणार आहे.
2. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना धक्का
1 एप्रिल 2022 पासून पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना आयकर कायद्याच्या कलम 80EEA अंतर्गत मिळणारा लाभ केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
3. गॅस दर वाढ होणार?
इंधन दरवाढ सुरू असताना आता घरगुती एलपीजी गॅस दरवाढीची झळ ग्राहकांना बसू शकते. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली होती. 1 एप्रिल रोजी नवीन दर जाहीर होण्याची शक्यता आहे.
4. पोस्ट ऑफिसच्या नियमांत बदल
1 एप्रिल 2022 पासून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यात उपलब्ध असतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही. सरकारने MIS, SCSS, टाइम डिपॉझिट खात्यांच्या बाबतीत मासिक, त्रैमासिक, वार्षिक व्याज जमा करण्यासाठी बचत खाते वापरणे अनिवार्य केले आहे.
5. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे नियम
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे चेक, बँक ड्राफ्ट किंवा रोखीने देता येणार नाहीत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला युपीआय अथवा नेटबँकिंगचा वापर करावा लागणार आहे.
6. पीएफ खात्यावर कर
एक एप्रिल 2022 पासून विद्यमान पीएफ खाते दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते. त्यावर कर आकारणी होऊ शकते. ईपीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा लागू केली जात आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे.
7. जीएसटी नियमात बदल
CBIC (केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ) ने वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई-इनव्हॉइस जारी करण्याची उलाढाल मर्यादा 50 कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून 20 कोटी रुपये केली आहे.
8. ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीचा विशेष लाभ बंद?
कोरोना काळात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक लाभ मिळत होता. आता काही बँका या योजना बंद करण्याची शक्यता आहे.
9. क्रिप्टोकरन्सीवर 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू
क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागू होणार आहे. व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA) किंवा क्रिप्टोकरन्सी विकून मिळालेल्या नफ्यावर 30 टक्के कर लागणार आहे.
10. वाहने महागणार
काही वाहन कंपन्यांनी 1 एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने 1 एप्रिलपासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 ते 2.5 टक्क्यांनी वाढवणार असल्याचे म्हटले आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाने 1 एप्रिलपासून आपल्या वाहनांच्या किमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ करणार असल्याचेही म्हटले आहे. टोयोटा 1 एप्रिल 2022 पासून आपल्या वाहनांच्या किमती 4 टक्क्यांनी वाढवणार आहे. BMW किमती 3.5 टक्क्यांनी वाढवणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Covid-19 Restrictions : आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त; दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही
- PM Kisan Scheme : तुम्हालाही 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये हवे आहेत? मग लवकर 'हे' काम करा, अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत!
- Adani Ambani: अदानींचे लक्ष अनिल अंबानींच्या 'या' कंपनींकडे ; कंपनी खरेदीसाठी लावली बोली!
- LIC IPO : एलआयसी आयपीओ लाँच करण्यासाठी सरकारकडे फक्त 12 मे पर्यंत वेळ; अन्यथा मोठं नुकसान
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha