(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Budget 2022: काय स्वस्त होणार, काय महागणार? अर्थसंकल्पाकडे असणार सामान्यांचे लक्ष
Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त होणार, काय महागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Budget 2022 : वाढत्या महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांचा या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा होऊ शकतात. यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त होईल, काय महागणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पेट्रोल-डिझेल
पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे सामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात करण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच वेळेस सरकार उपकर (सेस) वाढवून अथवा नवीन सेस लागू करून दुसऱ्या मार्गने किंमती वाढवू शकते.
विमा
मागील काही काळापासून विमा कंपन्यांकडून आरोग्य विम्यावर असणारा जीएसटी कमी करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. महाग असणाऱ्या प्रीमियममुळे अनेकजण आरोग्य विमा काढण्याबाबत अनुत्सुक असतात. अशातच आरोग्य विम्यावर असणारा 18 टक्के जीएसटी हा 5 टक्क्यांवर आणल्यास प्रीमियमचे दर कमी होतील.
एलपीजी गॅस सिलेंडर दर
स्वयंपाकासाठीच्या एलपीजी गॅस दराकडे लक्ष असणार आहे. केंद्र सरकारने उज्जवला योजनेतंर्गत मोफत गॅस सिलेंडर दिले. मात्र, गॅसचे दर एक हजार रुपयांच्या आसपास गेल्याने घराचे बजेट सावरताना सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील गरिबांनी पुन्हा एकदा चुलीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
मागील अर्थसंकल्पात काय झाले होते स्वस्त-महाग?
मागील वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काही उत्पादनांवर कृषी सेस लागू केला होता. यामध्ये मद्य, काबुली चणे, मटर, मसूर डाळ आदींचा समावेश होता. त्याशिवाय कच्च्या मालावरील आयात शुल्क वाढवले होते. काही स्टीलच्या उत्पादनांवरील शुल्क हटवले होते. कॉपर स्क्रॅपवरील आयात शुल्क 5 टक्क्यांहून कमी करत 2.5 टक्के केले होते. मोबाइल फोनसाठी वापरण्यात येणाऱ्या काही भागांवर 2.5 टक्के आयात शुल्क लागू केले होते.
मागील अर्थसंकल्पात कापूस, प्लास्टीक, रेशीम, चामडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, ऑटो पार्ट्स, मोबाइल फोन, चार्जर, आयात करण्यात आलेले कपडे, एलईडी बल्ब, मद्य महागले होते. तर, नायलॉनचे कपडे, लोखंड, स्टील, तांब्याच्या वस्तू, सोने, चांदी आणि प्लेटिनमसारख्या वस्तू स्वस्त झाल्या होत्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Budget 2022: आयकरात सवलत मिळणार का, शेतकऱ्यांसाठी खास घोषणा? अर्थसंकल्पापूर्वी जाणून घ्या 15 महत्त्वाच्या गोष्टी
- Union Budget 2022 : यंदाचं बजेटही 'डिजिटल'; सीतारमण यांचं भाषण किती वेळाचं असणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha