Share Market Opening Bell: शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीवर भर, बँक निफ्टीने गाठला उच्चांक
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसत असून बाजार वधारला आहे.
Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. अमेरिकन शेअर बाजार तेजीसह (US Share Market) बंद झाला. तर, आज आशियाई शेअर बाजारात (Asian Share Market) चांगली तेजी दिसून येत आहे. त्याच्या परिणामी भारतीय शेअर बाजारातही खरेदीचा जोर दिसत आहे.
आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 116 अंकांच्या 62,686 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 39 अंकांनी वधारत 18,648 अंकांवर खुला झाला. त्यानंतर विक्रीचा दबाव वाढू लागला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 49 अंकांच्या तेजीसह 62,619.96 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 15 अंकांनी वधारत 18,624.40 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 50 मधील 35 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी होती. तर, 15 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 24 कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. तर, सहा कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
निफ्टीमध्ये अदानी पोर्ट्सच्या शेअर दरात 1.69 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 1.67 टक्के, सन फार्मा कंपनीच्या शेअर दरात 1.01 टक्के, आयशर मोटर्सच्या शेअर दरात 0.90 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, एचसीएल टेकच्या शेअर दरात 5.26 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. इन्फोसिसच्या शेअर दरात 1.01 टक्के, टेक महिंद्रा 0.94 टक्के, विप्रोच्या शेअर दरात 0.42 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
बीएसईमध्ये इंडसइंड बँक, सन फार्मा, कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील, मारुती, आयटीसी, एचडीएफसी बँक, टायटन आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, टीसीएस, विप्रो, अॅक्सिस बँक, रिलायन्स कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
बँक निफ्टीनेदेखील उच्चांक गाठला आहे. बँक निफ्टी इंडेक्स आज 43,765.30 अंकावर खुला झाला. त्याने 43,853.40 अंकांचा उच्चांक गाठला. सकाळी 10.10 वाजण्याच्या सुमारास 43,800.50 अंकांवर व्यवहार करत होता. बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आदी बँकांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.
शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी प्री-ओपनिंग सत्रात भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडले. BSE निर्देशांक सेन्सेक्स 120 अंकांच्या उसळीसह 62,690 अंकांवर तर निफ्टी 53 अंकांच्या उसळीसह 18,662 अंकांवर व्यवहार करत होता.