अदानी-अंबानी जोरदार टक्कर! लवकरच अदानी बनणार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? जाणून घ्या कोणाची किती संपत्ती?
संपत्तीच्या बाबात देशातील दोन बडे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे.
Gautam Adani: संपत्तीच्या बाबात देशातील दोन बडे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. सध्या मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. पण लवकरच गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याची शक्यता आहे. कारण, सध्या गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोणाची किती संपत्ती?
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती वाढत आहे. मात्र, गौतम अदानी यांची संपत्तीत झपाट्याने वाढ होत आहे. जूनमध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी काही दिवसांनी लगेच त्यांना मागे टाकले होते. आता अदानी समूहाच्या कंपन्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं गौतम अदानी पुन्हा एकदा मुकेश अंबानींना टक्कर देत आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सध्या 114 अब्ज डॉलर्स आहे. तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 111 अब्ज डॉलर्स आहे. अदानी समूहाची कामगिरी अशीच सुरू राहिली तर लवकरच ते पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकतात.
मुकेश अंबानी हे जगातील 11 व्या क्रमांकांचे श्रीमंत व्यक्ती
मुकेश अंबानी हे जगातील 11 व्या क्रमांकांचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर गौतम अदानी हे ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी सध्या भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. यासह ते जगात 11व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या मागे 12 व्या क्रमांकावर गौतम अदानी आहेत. मात्र, विशेष म्हणजे या वर्षी मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 17.17 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. दुसरीकडे, गौतम अदानी यांच्या संपत्तीत 26.9 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. गुरुवारी, मुकेश अंबानी यांची संपत्ती 687 दशलक्ष डॉलरने वाढली आहे. तर गौतम अदानी यांची संपत्ती 2.90 अब्ज डॉलरने वाढली आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीतही वाढ
भारतातील आणखी तीन नावांचा या यादीतील 50 श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश आहे. यामध्ये शापूर मिस्त्री 41.8 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 35 व्या क्रमांकावर आहेत. तर शिव नाडर 38 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 40 व्या क्रमांकावर आहेत. तसेच सावित्री जिंदाल यांची संपत्ती देखील 34.9 अब्ज डॉलर आहे. सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. यावर्षी त्यांची एकूण संपत्ती 10.2 अब्ज डॉलरने वाढली आहे. जगातील सर्वात श्रीमंत महिला फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स आहे. ज्यांची एकूण संपत्ती 86.4 अब्ज डॉलर आहे. श्रीमंतांच्या यादीत त्या 20 व्या क्रमांकावर आहेत.
जगातील सर्वात 10 श्रीमंत व्यक्ती
इलॉन मस्क - 241 अब्ज डॉलर
जेफ बेझोस - 207 अब्ज डॉलर
बर्नार्ड अर्नॉल्ट - 182 अब्ज डॉलर
मार्क झुकरबर्ग - 177 अब्ज डॉलर
बिल गेट्स - 157 अब्ज डॉलर
लॅरी पेज - 153 अब्ज डॉलर
लॅरी एलिसन - 152 अब्ज डॉलर
स्टीव्ह बाल्मर - 145 अब्ज डॉलर
सर्जी ब्रिन - 144 अब्ज डॉलर
वॉरेन बफे - 136 अब्ज डॉलर
महत्वाच्या बातम्या: