अश्नीर ग्रोव्हर इज बॅक! आणलं 'Zero Pay' नावाचं नवं अॅप, नेमकं काय आहे यात?
अश्नीर ग्रोव्हर यांनी आता झिरो पे नावाचे नवे अॅप आणले आहे. या अॅपला आता किती यश मिळणार, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : शार्क टँक या कार्यक्रमामुळे अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) हे नाव सर्वांना परिचयाचं झालं आहे. ते 'भारत पे'चे सहसंस्थापक आणि माजी एमडी आहेत. आता ते झिरो पे (ZeroPe) नावाचे अॅप घेऊन येत आहेत. हे अॅप सध्या टेस्टिंग फेजमध्ये असून त्यावर काम चालू आहे. मात्र या अॅपची सध्या सगळीकडे चर्चा होत असून त्याच्या माध्यमातून यूजर्सना मेडिकल लोन दिले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार झिरो पे नावाचे हे अॅप थर्ड युनिकॉर्न (Third Unicorn) नावाच्या कंपनीमार्फत तयार करण्यात आले आहे. भारत पेमधून बाहेर पडल्यानंतर अश्नीर ग्रोव्हर यांनी थर्ड युनिकॉर्न ही कंपनी चालू केली होती.
झिरो पे अॅप काय आहे?
झिरो पे या अॅपची आणि कुकुट फिनवेस्ट या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीत एक करार करण्यात आला आहे. या अॅपच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतचं प्री-अप्रुव्ह्ड मेडिकल लोन दिलं जाणार आहे. करारबद्ध असलेल्या रुग्णालयांसोबतच या अॅपमधील सुविधांचा फायदा घेता येणार आहे. अश्नीर ग्रोव्हर यांच्या झिरो पेव्यतिरिक्त मेडिकल लोन देणारे बरेच अॅप उपलब्ध आहेत. यामध्ये Fibe, SaveIn, Neodocs, Kenko Qube Health, Arogya Finance and Mykare Health अशा अॅप्सचा समावेश आहे. अशा प्रकारच्या अॅप्सच्या माध्यमातून रुग्णालयात उपचारासाठी मेडिकल लोन दिले जाते. अॅडमिट होणे, होम केअर, क्रोनिक केअर मॅनेजमेंट आदी सुविधांसाठी हे पैसे वापरता येतात.
थर्ड युनिकॉर्न काय आहे?
अश्नीर ग्रोव्हर यांनी जानेवारी 2023 मध्ये पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि चंदीगड येथील उद्योगपती असीम घावरी यांना सोबत घेत थर्ड युनिकॉर्न नावाची कंपनी चालू केली होती. या कंपनीने सर्वांत अगोदर क्रिकपे नावाचा मंच चालू केला होता. ड्रीम 11, मोबाईल प्रीमियर लीग, गेम्स 24x7, माय 11सर्कल अशा प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यासाठी हा मंच चालू करण्यात आला होता. याच कंपनीने चालू केलेल्या झिरो पेला किती यश मिळणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
आशियातील 'या' पाच कुटंबांकडे आहे गडगंज पैसा, सर्वांधिक श्रीमंतांमध्ये अंबानी परिवाराचा कितवा नंबर?
आधी 12 आता थेट 214 रुपये! 'या' कंपनीच्या शेअरची कमाल, पैसे गुंतवल्यास व्हाल मालामाल!