अर्थसंकल्प 2019 : छोटे शेतकरी, कामगार, महिलांसाठी मोठे निर्णय, आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर

Background
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीचं हे शेवटचं अधिवेशन आहे. केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल आज सकाळी 10 वाजता अर्थसंकल्प मांडतील. निवडणुका तोंडावर असल्यानं संपूर्ण देशाच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसारखे भाजपचे गड काबीज केल्यानं 2014 पेक्षा यंदा काँग्रेसची ताकद वाढली आहे. शेतकऱ्यांमधील असंतोष हे या निवडणुकांमधील भाजपच्या पराभवाचं मुख्य कारण मानलं जातं. त्यामुळे कृषी योजना या अर्थसंकल्पातील लक्षवेधी ठरू शकतील.
देशात बेरोजगारीही कमालीची वाढली आहे. नोटाबंदी-जीएसटीनंतर व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. याचा फटका लोकसभेत बसू नये, यासाठी मोदी अर्थसंकल्पातून कोणतं ब्रम्हास्त्र काढतात, हे पाहणे गरजेचे आहे. काँग्रेसनं किमान वेतनाचं आश्वासन दिल्यानं मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेकडे कानाडोळा करून चालणार नाही. त्यामुळे त्यांची मतंही खेचण्यासाठी करसवलतीसह अन्य लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणुकीआधी मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमवर सरकार या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर मे महिन्यात सत्तेत येणारं सरकार जुलैमध्ये संपूर्ण बजेट सादर करणार आहे. त्याआधी आर्थिक सर्वेक्षण संसदेत मांडलं जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीला सुरु होऊन 13 फेब्रुवारीला संपणार आहे. एप्रिल, मे महिन्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर मे अखेरपर्यंत नव्या सरकारची स्थापना होईल. मात्र अंतरिम अर्थसंकल्पातही पुढील चार महिन्यांच्या खर्चाचा लेखाजोखा मांडला जाईल.
जेटलींच्या अनुपस्थितीत पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार
सध्या अर्थ मंत्रालयाचं कामकाज पाहणारे पियुष गोयल उद्या अर्थसंकल्प मांडणार आहेत. अरुण जेटली कॅन्सरच्या उपचारांसाठी परदेशी गेल्याने मागील आठवड्यातच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्याआधी अरुण जेटली यांनी पाच वेळा अर्थसंकल्प मांडला होता.
काल अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारच्या विकासयोजनांचा पाढाच वाचून दाखवला.























