एक्स्प्लोर
जेव्हा सगळं संपलंय असं वाटतं, त्यावेळी नवी उमेद देणारं वाक्य 'हीच तर सुरुवात'
आयुष्यात अनेकदा कठिण प्रसंगांचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगात सगळं संपलंय असं वाटतं, अशाच प्रंसगांतून नव्या उमेदीनं उभं राहण्यासाठी वाचा सचिन अतकरे यांचा हा ब्लॉग...
7 वीत असेल ती त्यावेळी, फार एवढं काही कळतही नसावं. शाळेत 'ढ' म्हणायचं नाही म्हणून 'सरासरी' आहे म्हणायचं, अशी स्थिती. घरातलं पहिलंच अपत्य. 'पाहिलंच बाळ' म्हणून आईवडिलांच्या चेहऱ्यावर खुललेल्या आनंदाच्या अनेक लाखो सरीत पहिलीच 'मुलगी' झाली म्हणून सुखाला सुट होणार नाही, अशी एक दुःखाची सरही होतीच. ती दुसऱ्या बाळाच्या वेळी पुसली जाईल ही आशा अशा आईवडिलांना कुठंतरी असतेच. पण दुसऱ्या वेळी फिक्कट पडायची सोडून ही लकेर अजूनच गडद झाली. आजच्या आधी 25 वर्षापूर्वी दोन 'मुलीच' होणं म्हणजे हे ऐकणाऱ्या लोकांच्या मनात - पत्र्यावर खिळा ओरखडावा अन् त्याचा दात कळकळवणारा कर्कश आवाज यावा तसं व्हायचं.
आई वडील शिकलेले असले अन त्यांना आपल्या मुलींचा अभिमान असला तरी नातेवाईक किंवा शेजारी वगैरे अधून-मधून एखाद्या वाक्यातनं "दोन्ही मुलीच आहेत" याची सरसर आठवण करून द्यायचेच. या सगळ्याकडं जमेल तितकं दुर्लक्ष करून मुली घरात चांगल्या वाढवल्या जात होत्या. त्यांच्या अभ्यासासाठी जमेल तितके प्रयत्न केले जात होते.
...अशात ज्याची वाट पाहिली जात होती ती गोष्ट घडली अन् घरात आनंद घेऊन एक इवलसं बाळ आलं... मुलगा... सगळे प्रचंड खुश झाले. दिवस आनंदात जात होते. वाढणाऱ्या बाळासोबत हिची चांगलीच गट्टी जमली होती. वयात खूप फरक असला तरी हक्काचा भाऊ आला होता... आता हिचा सातवीचा अभ्यास सुरू झाला. पण आई-वडील, आजी कुणी कितीही सांगितलं तरी हिला अभ्यास मात्र नकोनकोसाच वाटायचा. किळस यायची.
एके दिवशी वर्गात गणिताचा तास चालू असताना शिपाई आत आला अन् सरांना म्हणला, 'काजोल पाटीलला घरी बोलावलंय'. मामाच्या गावाला किंवा गावच्या यात्रेला जायचं असेल तर असं वर्गात कोणाला-न-कोणाला मधेच घरून बोलावणं यायचं. ती दप्तर अडकवून खुशीत घरी निघाली. वाटेत गावाला गेल्यावर काय काय करायचं?, याचे अनेक चांगले विचार मनात घोळतच होते. पण घरी पोचली तर वेगळंच वातावरण होतं. सगळे चिडीचूप शांत बसले होते. अन् आई वडील, घरचे काही लोक मात्र जोरजोरात रडत होते. आजवर कधीच न पाहिलेलं, न कल्पना केलेलं असं दृश्य अचानक समोर बघून हिच्या इवल्याशा काळजात चर्रर्र झालं.
कारण होतं, एक दोन दिवसांच्याच कुठल्यातरी आजाराने ते पिल्लू हिच्यापासून, घरापासून, गावापासून, जगापासून दूर निघून गेलं होतं. सगळे आतून तुटले होते. आयुष्याचा उद्देश नाहीसा झालेला. आई वडिलांचं दुःख सावरता यावं एव्हढीही ही अजून मोठी झाली नव्हती. "फ्रॉक चिखलाने घाण झाला" हेच आजवरचं हिचं सर्वात मोठं दुःख. त्यात आता भाऊच गेला म्हणजे? टेकडीच्या मानेवर हिमालायचं दुःख कसं मावणार होतं? आपल्या छोट्या अजून तितकंसं न समजणाऱ्या बहिणीला कवटाळून फक्त ही गुपचूप रात्री रडायची.
हळू हळू मनात झालेली खोल जखम तशीच दाबून ठेवत घर पुढं सरकत होतं. सगळ्यांचा जरी जगायचा उद्देश नाहीसा झाला होता. पण हिला मात्र उद्देश सापडल्यासारखं झालं. इतके दिवस सगळ्यांनी सांगून थकून जाऊनही पुस्तकाला साधा हातही न लावणारी ही आता पुस्तकां'शिवाय' दिसणं अवघड झालं होतं. तिची जखम नेमकी काय होती?, हे फक्त तिलाच माहित होती. पण तिनं आतल्या आत काहीतरी ठरवलं होतं. आजी हिला पाहून म्हणायची हा 'आमचा पोरगा' खूप मोठा होणारे, शिकून साहेब होणारे. (हे वाक्य ऐकून तिला चांगलंही वाटायचं अन वाईटही.)
पण आजीचं बोलणं खरं होत होतं. आधी निव्वळ सरासरी असलेल्या या पोरीने दहावीत मात्र तब्बल 93 टक्के मार्क घेतले. अन् 12 वीत तर 92 टक्के मार्क घेत ती शाळेत तिसरी आली... पण तिला स्वतःला याचं काही वाटत नव्हतं. एवढ्या हुशार असलेल्या पोराचं किंवा पोरीचं पुढं काय व्हायचंय? हे त्यांच्यापेक्षा समाजानं जास्त, आधीच ठरवून टाकलेलं असतं. डॉक्टर ...नाहीतर ...इंजिनिअर!!! संपला विषय.
हिच्या बाबतीतही हेच सुरू होतं. पण तिच्या सौम्य कडाडीच्या विरोधापुढे सगळ्यांना माघार घ्यावी लागली. आई वडिलांनी मात्र तिला प्रचंड सपोर्ट दिला. तिने मनात काहीतरी ठरवलेलं. अन् त्याचाच भाग म्हणून सगळ्यांचा साहजिक विरोध सहन करत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मध्ये BTech Agriला ऍडमिशन घेतलं. मार्क्स चांगले मिळवता मिळवता फायनल इयरला येईपर्यंत संपूर्ण आयुष्यावरची धूळ उडून गेली होती. आता स्पष्ट दिसायला लागलं होतं. काय करायचंय याची नेमकी दिशा ठरली होती. फायनल इयर संपलं अन हिने पुढचा अभ्यास सुरु केला......
"यश येईल तर ते एकदाच. प्रयत्नही एकदाच करायचा. नाही यश मिळवता आलं तर , दोरा तुटलेला पतंग होईल अन् आयुष्य भरकटलं तरी चालेल पण पुन्हा प्रयत्न नाही." असं ठरवून तिने अभ्यास सुरू केलेला. प्रचंड रिस्क होती यात.
पहिलाच प्रयत्न... अभ्यास केला... अजून अभ्यास केला, खूप केला... परीक्षाही झाली... निकाल आला.... अन् पास झाली... त्याचीच पुढची परीक्षा आली... पुन्हा तिने अभ्यास केला... अजून केला... जमेल तितका तुटून केला..... पण मग मधेच रक्षाबंधन यायचं... ही तुटून फुटून हुंदकुन जायची... काय करावं सुचायचं नाही... भाऊ आठवायचा... पण तेच आठवून परत अभ्यास सुरू व्हायचा... दुसरी परीक्षा झाली... काही महिन्यात निकाल आला... त्यातही पास झाली.. शेवटची तिसरी परीक्षा, तिसरा अभ्यास, ... तिसरा निकाल... शेवटचा... एका आयुष्याचा फैसला ठरवणारा... तो ही आला... अन्... श्वासांचं चीज झालं... "काजोल पाटील गावात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही तर.... संपूर्ण भारतात मुलींमध्ये "पहिली" आली होती..."
महाराष्ट्रातही मुला-मुलींमध्ये ती तिसरी आली होती... संपूर्ण देशात अकरावी आली... तिच्या कॉलेजची UPSC मधून पहिली महिला अधिकारी झाली... कॉलेजची टॉपर बघता बघता देशाची टॉपर झाली... अजूनही अनेक रेकॉर्डस तुटले... तेही कोणत्या परीक्षेत तर देशातल्या सर्वात कठीण ... ज्यातून IAS, IFS, अन् IPS निवडले जातात अशा All India Services, UPSC मधून...
ही "पहिल्याच प्रयत्नात" सुपर क्लास वन म्हणजे IFS झाली होती...... जी आता डायरेकट "मिनिस्टरी ऑफ एनवर्नमेंट", भारत सरकारला रिपोर्ट करणार होती... अन् वय... ते अवघं 23 वर्ष... तेही परिक्षेचा प्रयत्न "पहिलाच".. हिने घरी रिझल्ट सांगितला तेव्हा कित्येक वेळ घरचे विश्वासच ठेवायला तयार नव्हते. तेव्हा दुसऱ्या एका सरांना फोन करून घरच्यांना समजावून सांगावं लागलं... तिची छोटी बहीणही आता MBA करतेय...
एखादी घटना, आयुष्यावर किती खोल परिणाम करते, मनात ठरवलं की माणूस काय साध्य करू शकतो, हिमालया एव्हढ्या मोठ्या दु:खालाही माणगुटीवर घेऊन कसा धावत सुटून पहिला येऊ शकतो... मुलगा मुलगी समानता यांच्या पोकळ गप्पांमध्ये न पडता त्यांना एक माणूस म्हणून शिक्षण अन् चांगल्या सोयी पुरवल्या की, त्यांच्या कष्टाने ते कसं आभाळ फाडून स्वर्ग खाली आणू शकतात, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे काजोल , तिची बहीण ऋतुजा अन संपूर्ण पाटील कुटुंब आहेत...
आजही विचारलं की काजोल सांगते "आम्हा कोल्हापूरच्या माणसांना सगळं हरलं तरी राज्य कसं उभारायचं हे महाराजांच्या सुनबाई - महाराणी ताराबाईंनी चांगलं शिकवलंय..." त्यांचाच आदर्श ठेवून देशाला ecology साठी जगात सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी नक्की काहीतरी काँक्रीट करेल... काजोल सध्या देहराडूनमधल्या "इंदिरा गांधी फॉरेस्ट अकादमी" येथे पुढच्या दिड वर्षाच्या ट्रेनिंग साठी गेलीय..... अधिकारी असण्यापेक्षा एक चांगला माणूस म्हणून तू कायम या देशाच्या कपाळावर नाव कोरशील हा विश्वास आहे काजोल...
ऑल द बेस्ट..!! 💐💐💐
तुझ्या संघर्षाची अन् दुःखाला हरवण्याची लकेर इथल्या लाखोंच्या तळहातावर उमटो...!
ज्यांना सगळं संपलंय असं वाटतंय, त्यांना 'हीच तर सुरुवात' आहे याचा आत्मविश्वास मिळो, ज्या आई वडिलांना आपल्या मुलीच झाल्या, त्यांना आता आपल्याला "मुली" झाल्यात याचा अभिमान वाटो... हीच सदिच्छा..!!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
व्यापार-उद्योग
धाराशिव
Advertisement