एक्स्प्लोर
Advertisement
ब्लॉग : हुंड्यामुळे हळद निघण्यापूर्वीच लग्न मोडलं!
मुलाकडच्यांनी एक रुपयाही हुंडा न घेता मुलीशी लग्न करण्याचं मान्य केलं. फक्त लग्न चांगलं करुन द्या एवढीच अट होती. त्यामुळे मुलीच्या बापानेही हुंडा द्यायचा नाही म्हणून मोठं लग्न करुन दिलं. लग्न झाल्यानंतर मुलीच्या अंगाची हळद निघत नाही तोच, "ही बापाकडून काहीच घेऊन आली नाही", अशी भावना सासरच्यांची जागृत झाली. बापाकडून एवढे-एवढे पैसे आण, माझ्या शिक्षणाचा, बाहेर राहण्याचा खर्च करायला सांग, असं म्हणून नव्या नवरीला सासरच्यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून त्रास देणं सुरु केलं. मात्र काहीही झालं तरी एक रुपयाही देणार नाही म्हणत त्या नव्या नवरीने लग्न झाल्यानंतर चार ते पाच दिवसात नवऱ्याला सोडलं.
हुंड्यापायी समाजात काय होतंय, त्याचंच हे एक उदाहरण आहे. बीड जिल्ह्यातील एका मुलीच्या सुरु न झालेल्या संसाराची ही अखेर होती. मुलगीही केवळ घरकाम करणारी नव्हती. उच्च शिक्षित आणि स्वतःचं घर चालेल एवढं कमावणारी होती. मात्र हुंड्याची लालच काहीही झालं तरी सुटत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
बीड जिल्ह्यातील ही तरुणी उच्चशिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी होती म्हणून तिला या सगळ्यातून बाहेर पडणं सोपं गेलं. घटस्फोटानंतर तिच्या हुंडा मागणाऱ्या नवऱ्याने दुसरं लग्नही केलं. पण हुंड्याविषयी या मुलीच्या मनात निर्माण झालेली चिड तिला आजही अस्वस्थ करते. संसार सुरु होण्याआधीच मोडल्यानंतरही ही तरुणी मोठ्या जिद्दीने उभी राहिली. कसलाही विचार न करता पुन्हा कामाला लागली आणि नवीन आयुष्य सुरु केलं.
विशेष म्हणजे याच हुंडाबळी ठरलेल्या तरुणीच्या मागे दोन बहिणी आहेत. त्यांच्या लग्नासाठीही हुंडा हीच मोठी अडचण आहे. एकीकडे हुंड्यामुळे आयुष्य उध्वस्त झालेली तरुणी आणि दुसरीकडे तिच्याच बहिणींना पुन्हा हुंडा द्यावा लागल्याशिवाय लग्न होत नाही, हे तिच्यासाठी आणखी वेदनादायी आहे.
लग्नाआधी हुंडा नको, फक्त मुलगी द्या ही मानसिकता आणि लग्नानंतर लागेल तेवढा पैसा द्या, ही विकृती किती जीवघेणी आहे, हे वेगळ्या शब्दात सांगण्याची गरज नाही. पण अशी विकृतींना समाजाशिवाय दुसरं कोण चांगलं ठेचू शकतो. प्रत्येक बापालाही एक मुलगी आहे, तशीच आपणही दुसऱ्याची मुलगी आणलेली आहे, असा साधा विचारही या विकृतींच्या मनात येत नसेल का? या गोष्टींना कायदा काहीही करु शकत नाही. आधीच संकटात सापडलेला मुलीचा बाप कायदेशीर लढाई लढण्यात असमर्थ ठरतो.
या घटनेला आज तीन वर्ष उलटले आहेत. मात्र एबीपी माझाची औरंगाबादेतली हुंडा विरोधी परिषद पाहून या तरुणीला आपल्यावर झालेल्या अन्यायाची पुन्हा जाणीव झाली. आता या घटनेवर फेरविचार करुन काहीही होणार नाही. कारण ही तरुणी या दुःखातून कधीच बाहेर आली आहे. स्वतःच्या पायावर उभं राहून तिने आपलं नवीन आयुष्यही सुरु केलंय. पण यातून हुंडा देऊन लग्न करण्यासाठी तयार असलेल्या अनेक मुलींना काही तरी शिकायला मिळेल एवढं मात्र नक्की.
मुलीच्या लग्नात लाखो रुपये खर्च केले, संसार सुरु होण्याआधीच मोडला, मनस्ताप सहन करावा लागला, शिवाय स्वतःच संकटात असून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टकचेरी करण्यासाठी वेगळा खर्च करावा लागला. एवढंच नव्हे, तर मुलींच्या आई-वडिलांवर अशी वेळ आल्यानंतर समाजाला तोंड द्यावं लागतं ते वेगळंच. मुलीचं आयुष्य उध्वस्त होतं, नवीन स्थळं लवकर स्वीकारत नाहीत. राज्यभरातील हुंडाबळींची हीच परिस्थिती आहे.
जुनाट परंपरांनुसार मुलीचे आई-वडील हुंडा देत आलेतच. हुंडा ही प्रथा किती वाईट आहे, याची जाणीव मुलीच्या आई-वडिलांना वेळोवेळी होतेच. फक्त मुलांनी आपल्या आई-वडिलांमध्ये हुंडाविरोधी दृष्टीकोन तयार करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शिवाय हुंड्यापायी नव्या नवरीला सोडून देणाऱ्या या विकृतींचं काय करायचं? याचा निर्णयही समाजालाच घ्यायचाय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement