Blog : झेपावे मिलियन्सकडे...
घरी वडील रागावले की तुडव-तुडव तुडवायचे... शाळेत गुरुजी, मॅडम साध्या फुटपट्टीने नाही तर कोवळ्या बांबूच्या लांबसडक काठीने सटा-सट झोडपायचे... त्यांचं रागावणं हे आपल्याच भल्यासाठी होतं हे आता मोठं झाल्यावर लक्षात येतं आपण लहानपणी किती माती खाल्ली होती...
राग हा बऱ्यापैकी जेवणावर निघायचा मात्र कधी घर सोडलं होतं आठवत नाही बुवा.. किंवा घरातून निघून जायचे प्रकार माहितीच नव्हते. 'तिचे' पप्पा रागावले काय आणि औरंगाबादची बिंदास बंदी घर सोडून निघाली थेट मध्य प्रदेशात. बरं चला अशी प्रकरणे आपल्याला काही नवी नाहीत,प्रेयसीला भेटायला पाकिस्तानला निघालेला उस्मानाबादचा तरुण आठवला, बरेच भन्नाट किस्से घडलेत आणि घडतात देखील.
व्हायरल होणं आणि चर्चेत राहण्यासाठी सतत नवनवीन हटके गोष्टी, उचापात्या करणं आणि अनपेक्षित व्हायरल झाल्यावर त्याचा फायदा करियर आणि प्रसिद्धी साठी करणं हे आलंच, मग यात अगदीच ताजं उदाहरण देयचं झालं तर नुकताच एक व्हिडिओ लिक झालेला त्या चर्चेचा फायदा अंजली अरोराला तिच्या नव्या अल्बमची पब्लिसिटी करण्यासाठी झाला अश्यासुद्धा चर्चा रंगल्या होत्या. एवढंच नाही तर रानू मंडल, 'कच्चा बदाम..' गाणाऱ्या भुवन बडायकर यांना चक्क अभिनयाच्या ऑफर आल्या आहेत. 'बाबा का ढाबा...' चालवणारे कांता प्रकाश यांना तर प्रसिद्धी मिळाली आणि रस्त्यावरचा ढाबा ते थेट चकाचक रेस्टॉरंट हातात आलं आणि पुन्हा नियतीने त्यांना फुटपाथवर आणलं...
सोशल मीडियात ट्रेंडींग होणं, चर्चेत येणं हे फायद्याचं असतंच असं नाही. कोव्हीड काळात जमाव बंदी असताना मध्यंतरी एका युट्यूबरच्या वाढदिवसासाठी मेट्रो स्टेशनवर उसळलेळी गर्दी...ते प्रकरण सगळं चमत्कारिक वाटतं... कारण सोशल मीडियाचा प्रत्येक वापरकर्ता हा त्या घटनेशी जोडला गेलेला असतो कारण युजर्सच्या वैयक्तिक आयुष्यात कितीही खलबतं असली तरी सोशल मीडियावर आपण कोणाला फॉलो करतोय, काय पाहतोय आणि जे पाहतोय, वाचतोय त्यावर व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कधी व्यक्त होत नकळतपणे ट्रोलिंग करतो तेच परत सायबर गुन्हेगारीकडे वाटचाल होतेय हे लक्षात येत नाही.
युट्यूब, फेसबुक, ट्विटर असो वा रोजचं इन्स्टाग्राम ही समाजमाध्यमं हल्ली फक्त मनोरंजनाचं फुकटचं माध्यम हातात आहे असं अज्ञान घेऊन कित्येक मंडळी राहतात मात्र प्रत्येक यूजर यामागे किती किंमत मोजतोय याची कल्पनाही नसेल, कदाचित त्यावर स्वतंत्र ब्लॉग लिहिता येईल...
मात्र एखादी गोष्ट व्हायरल झाली की संबंधित नाव, व्यक्ती गोष्टींचा सर्च वाढतो आणि Indirectly Publicity होते.. याचा फायदा सोशल मीडियावरील त्यांच्या सर्व माध्यमावरील खात्यांना झालेला पाहायला मिळतो...
तरी उर्फी जावेद अंग झाकण्यापुरते कपडे घालून कधी प्रसिद्धी तर कधी ट्रोलिंगची शिकार होतेच... त्यात रणवीरचं न्यूड फोटोशूट कमालीचं चर्चेत आलेलं दिसून आलं...
सोशल मीडियावर Follower, Subscribers वाढले आणि प्रचंड View's मिळवून स्वतःला Digital Creater, Influencer घोषित करणं आणि त्याच्या माध्यमातून मार्केटिंग क्षेत्रातून advertisement मिळवून पैसा कमावण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवणं, चित्र विचित्र प्रयोग करणं आणि लक्षवेधी ठरण्यासाठी वाट्टेल ते करणं...
हे सगळं कधी अंगलट येतं तर कधी अनपेक्षित उंची सुद्धा मिळवून देतं.. ही चमको स्टंटबाजी पॉलिटिकल नेते मंडळी करण्यात पण मागे नसतात... आम्ही वर्गात असताना डॉक्टर, वकील, पत्रकार होयची स्वप्न पाहायचो हल्ली बाळ जन्माला येण्या आधीच त्याचं सोशल मीडियावर आकाउंट रेडी असतं... आणि त्याला स्टार करायचं हेच स्वप्न बिंबवलं जातं...
आता हेच बघा ना, आरामात मिलियन्समध्ये Subscriber असलेली औरंगाबादची बिंदास बंदी अचानकपणे गायब होते, पोलीस शोधमोहीमेवर असताना, तिच्या आईवडिलांना या परिस्थितीत देखील तिच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट करणं महत्वाचं वाटलं, मात्र नेटिझन्सच्या कट्ट्यावर चर्चा अशा रंगल्या की काय सांगता...
खरंच तिचे वडील रागावले म्हणून हे घडलं? पडद्यामागील कारण शोधणारे आपण कोण? खरं काय ते त्यांना माहीत. मात्र बिंदास बंदीचे अन् एका दिवसात 70,000 Youtube Subscriber वाढले कदाचित नवख्या Creaters ला यासाठी किती वर्षे पापड तळावे लागले असते याचा अंदाजा आपण लावू शकत नाही...
काव्या खरंच बिनधास्त आहे म्हणायला हरकत नाही, मात्र एक सामान्य नेटिझन किंवा सोशल मीडिया वापरकर्ता म्हणून आपण काय लाईक करतोय? का शेयर करतोय? आपल्या भावना व्यक्त करण्याची पद्धत अश्या सर्वसमावेशक गोष्टींचं भान आणि विचार करून आपल्या बुद्धीची घंटी कोणत्याही युट्यूब चॅनेलची घंटी वाजवण्याआधी वाजवावी हीच अपेक्षा...
विनीत वैद्य यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग