एक्स्प्लोर
विदर्भाचे पोट्टे हुश्शार....
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या रणजी करडंकात यंदा सलग दुसऱ्या वर्षी विदर्भाचे पोट्टे हुशार ठरले. भारतीय क्रिकेटमध्ये एक जमाना असा होता की, विदर्भ रणजी करंडकाच्या फायनलमध्ये धडक मारेल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसतं. पण फैझ फझल आणि त्याच्या शिलेदारांनी यंदाही खरोखरच कमाल केली. विदर्भानं लागोपाठ दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर विदर्भाच्या कामगिरीचा आढावा घेणारा हा लेख.
फैझ फझलच्या विदर्भाने यंदा सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. नागपूरच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात विदर्भानं सौराष्ट्रावर 78 धावांनी मात केली. या सामन्यात विदर्भानं सौराष्ट्राला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. पण आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे यांच्या फिरकी आक्रमणासमोर सौराष्ट्राचा दुसरा डाव 127 धावांत आटोपला.
मुंबई आणि महाराष्ट्र या भावंडांचं आव्हान यंदा रणजी करंडकाच्या साखळीतच संपुष्टात आलं होतं. त्यामुळं विदर्भाचं रणजी करंडकातलं घवघवीत यश अधिकच उठून दिसतं. आजवर धंतोली-रामदास पेठेत अडकलेलं विदर्भाचं क्रिकेट आज ग्रामीण भागात सुदूर पसरलं आहे. त्याचंच हे फलित आहे.
विदर्भाच्या फायनलमधल्या विजयाचा आदित्य सरवटे हा प्रमुख शिल्पकार ठरला. सरवटेच्या डावखुऱ्या फिरकीनं रणजी फायनलला विदर्भाच्या बाजूनं गिरकी दिली. त्यानं अंतिम सामन्यात अकरा विकेट्स काढल्याच, पण सौराष्ट्राच्या चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावांत मिळून केवळ एकच धाव करू दिली. पहिल्या डावात पुजारानं सरवटेच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये वासिम जाफरच्या हाती झेल दिला. दुसऱ्या डावात त्याला भोपळाही फोडता आला नाही. सरवटेनं त्याला पायचीत केलं.
याच चेतेश्वर पुजारानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या चार कसोटी सामन्यांमध्ये तीन शतकांसह 521 धावांचा रतीब घातला होता. पण फायनलच्या रणांगणात सरवटेनं त्याला घडवलेला धावांचा उपवास विदर्भाला रणजी करंडकाचा मान देणारा ठरला.
विदर्भाच्या लोअर मिडल ऑर्डरनं दोन्ही डावांत बजावलेली कामगिरी फायनलच्या लढाईत खूपच मोलाची ठरली. विदर्भानं पहिल्या डावात सहा बाद, 139 धावांवरुन सर्व बाद 312 धावांची मजल मारली. अक्षय वाडकर, अक्षय कर्णेवार आणि अक्षय वाखरे या तीन नावबंधूंनी रचलेल्या छोट्या, पण झुंजार भागीदारी कमालीच्या होत्या. दुसऱ्या डावात आदित्य सरवटेनं बॅट चालवली म्हणूनच विदर्भानं सहा बाद 105 धावांवरून सर्व बाद 200 धावांची मजल मारली. विदर्भाच्या लोअर मिडल ऑर्डरची हीच कामगिरी रणजी करंडकाच्या अंतिम लढाईत निर्णायक ठरली.
रणजी करंडकाच्या यंदाच्या अख्ख्या मोसमाचा विचार करायचा झाला, तर विदर्भाच्या अनुभवी शिलेदारांनी आपली कामगिरी चोख बजावली. तुम्हीच बघा...
वासिम जाफर - यंदाच्या मोसमात अकरा सामन्यांमध्ये 69.13च्या सरासरीनं 1037 धावांचा रतीब.
कर्णधार फैझ फझल - अकरा सामन्यांमध्ये 50.13च्या सरासरीनं 752 धावा.
यष्टिरक्षक आदित्य वाडकर - अकरा सामन्यांमध्ये 60.41च्या सरासरीनं 725 धावा. यष्टिपाठी 21 झेल आणि सहा यष्टिचीत
गणेश सतीश - अकरा सामन्यांमध्ये 33.80च्या सरासरीनं 507 धावा
अष्टपैलू आदित्य सरवटे - अकरा सामन्यांमध्ये 354 धावा आणि 53 विकेट्स.
ऑफ स्पिनर अक्षय वाखरे - दहा सामन्यांमध्ये 34 विकेट्स, त्यात अंतिम सामन्यात सात विकेट्स
वेगवान गोलंदाज उमेश यादव - अवघ्या तीन सामन्यांमध्ये 23 विकेट्स
ललित यादव - सहा सामन्यांमध्ये 19 विकेट्स
यंदाच्या रणजी करंडकातल्या विदर्भवीरांची नावं तरी किती घ्यायची? विदर्भाच्या प्रत्येक शिलेदारानं आपली कामगिरी अगदी चोख बजावली. म्हणूनच प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाला सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर आपलं नाव कोरता आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
पुणे
क्रीडा
करमणूक
Advertisement