(Source: Poll of Polls)
BLOG : ‘वात्सल्यसिंधू’ सुलोचनादीदींना फाळके पुरस्काराचा मान कधी?
भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणारा केंद्र शासनाचा दादासाहेब फाळके हा पुरस्कार लोकप्रिय अभिनेते रजनीकांत यांना जाहीर होणं हा मराठी माणसांसाठी जितका विलक्षण योग आहे, तितकाच तो जाणकार मराठी मनाला खटकणाराही आहे. त्याचं कारण रजनीकांत यांच्यापेक्षा वयानं 22 वर्षे आणि चित्रपटसृष्टीतल्या अनुभवानं तब्बल 32 वर्षे ज्येष्ठ असलेल्या अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजे आपल्या सुलोचनादीदी यांचा या पुरस्कारासाठी अजूनही विचार झालेला नाही.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेले मराठमोळे निर्माते-दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार रजनीकांत यांना म्हणजे मूळच्या शिवाजीराव गायकवाड या मराठीभाषिक अभिनेत्याला मिळणं हे त्यांच्या कट्टर चाहत्यांइतकंच कुणीही सहज स्वीकारतं. कारण रजनीकांत यांची लोकप्रियता. पण केंद्र शासनाच्या सर्वोच्च पुरस्काराचा लोकप्रियता हा निकष ठरू शकते का?
सत्तर वर्षांच्या रजनीकांत यांनी गेली 45 वर्षे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. पण त्यांच्या स्टाईलबाज अभिनयाचे हिंदी चित्रपटसृष्टीतही लाखो चाहते आहेत. एक सुपरस्टार असूनही, 'मै ऐसाही हूं' शैलीतल्या साध्या राहणीमुळं रजनीकांत यांची जनमानसातली प्रतिमा त्यांच्या पडद्यावरच्या प्रतिमेपेक्षा कितीतरी पटीनं मोठी बनली आहे. पण निव्वळ चित्रपटसृष्टीतल्या योगदानाचा विचार करायचा, तर रजनीकांत यांच्या तुलनेत आपल्या वात्सल्यसिंधू सुलोचनादीदीचं पारडं खूपच जड भरतं.
दिग्गज अभिनेत्री सुलोचनादीदी आज 92 वर्षांच्या आहेत. त्यांनी स्वातंत्र्याच्या आधीपासून म्हणजे 1943 सालापासून दीडशेहून अधिक मराठी आणि अडीचशेहून अधिक हिंदी चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. भारताच्या अनेक राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिनयाचा वेळोवेळी गौरव केला आहे. त्यांच्या अभिनय कारकीर्दीचा 61 संस्थांनी आणि 13 शासकीय किंवा प्रतिष्ठित पुरस्कारांनीही उचित गौरव केला आहे.
एका जमान्यात सुलोचनादीदी या थोरली बहीण किंवा थोरल्या वहिनीच्या भूमिकेत शोभून दिसायच्या. त्यानंतरच्या काळात त्यांनी रजनीकांत आणि त्यांचाही आदर्श असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या पिढीच्या अनेक नायकांवर पडद्यावर आणि पडद्याबाहेरही आईची माया केली आहे. प्रसंगी सुलोचनादीदी यांनी पडद्यावर त्यांचे कानही उपटण्याचा अभिनय केला आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले, निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई आणि गायक-संगीतकार शंकर महादेवन या मराठी मातीत घडलेल्या दिग्गजांसह मोहनलाल आणि विश्वजीत चॅटर्जी या बड्या अभिनेत्यांचा समावेश असलेल्या निवड समितीसमोर सुलोचनादीदींचं कर्तृत्त्व खरं तर उगाळण्याचीही गरज नाही.
मग दादासाहेब फाळके पुरस्काराच्या शर्यतीत त्या मातृतुल्य अभिनेत्रीला डावलून रजनीकांत यांची पुरस्कारासाठी निवड करण्यामागे त्या पंचपरमेश्वराची नेमकी कोणती भूमिका होती?
रजनीकांत यांची सुपरस्टार इमेज सुलोचनादीदींच्या वात्सल्यसिंधू आईच्या प्रतिमेपेक्षा मोठी ठरली का?
रजनीकांत यांची केंद्रातल्या सत्ताधारी भाजप आणि संघाच्या जवळ जाणारी विचारसरणी त्यांना अधिक जवळची वाटली का?
तामिळनाडूत आधी राजकीय पक्ष स्थापण्याची घोषणा करून मग प्रकृती अस्वास्थ्याच्या निमित्तानं निवडणुकीच्या तोंडावर माघार घेण्याची रजनीकांत यांची तडजोड अधिक वजनदार ठरली?
दादासाहेब फाळके पुरस्काराचे रजनीकांत हे आजवरचे 51वे मानकरी आहेत. याआधीच्या 50 मानकऱ्यांमध्ये 44 पुरुष आणि केवळ सहाच महिलांचा समावेश आहे. देविकाराणी, रुबी मेयर्स, काननदेवी, दुर्गा खोटे या थोर अभिनेत्रींसह लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना भारतीय चित्रपटसृष्टीतल्या योगदानासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. फाळके पुरस्कारानं सुलोचनादीदींचा वेळीच गौरव झाला असता तर भारतीय चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान स्त्री कलावंतांवरचा अन्यायही काही अंशी तरी दूर होऊ शकला असता. आणि त्यासाठी रजनीकांत यांना आणखी एखाददुसरं वर्ष फाळके पुरस्कारासाठी प्रतीक्षा करायला लागली असती तर ते गैर ठरलं नसतं.