एक्स्प्लोर
BLOG : सिनेमॅटिक लिबर्टी आणि 'तान्हाजी'
'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट सध्या तिकीट बारीवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास साऱ्या जगभरात पोहोचत असला तरी, ज्यांनी महाराजांचा इतिहास वाचला आहे त्यांना हा सिनेमा पाहताना अनेक गोष्टी खटकतात किंवा खटकू शकतात. सत्यघटनेवर बेतलेल्या या सिनेमांना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं योग्य आहे का हा मूळ मुद्दा आहे. कोणताही चित्रपट तयार करताना सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला तर त्यात काही गैर नाही, पण याच लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शक सत्य घटना, त्याची मांडणी कशी काय बदलू शकतो हाही प्रश्न पडतो.
'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट सध्या तिकीट बारीवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. अवघ्या सहा दिवसांत या सिनेमाने 107 कोटींहून अधिकची कमाई केली. मुळात तान्हाजी मालुसरे आणि कोंढाण्याचा इतिहास या सिनेमाच्या माध्यमातून साऱ्या जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय ही एक सकारात्मक गोष्ट आहे. आता तान्हाजी मालुसरे फक्त मराठी लोकांपुरता मर्यादित न राहता त्यांची ख्याती जगभरात पसरत आहे. 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर हा सिनेमा कथा, पटकथा, संवाद लेखन, चित्रीकरण अशा सगळ्याच बाबतीत सरस ठरतो. अभिनेता अजय देवगण, काजोल, शरद केळकर, सैफ अली खान, देवदत्त नागे, अजिंक्य देव, तसेच लेखक प्रकाश कपाडिया आणि दिग्दर्शक ओम राऊत या सर्वांनीच चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
सतरा वर्षांच्या शिवरायांनी 1647 मध्ये आदिलशहाच्या ताब्यातील तोरणा गड जिंकला आणि 17 व्या शतकाच्या मध्यावर पश्चिम महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवरायांमुळेच विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघलशाहीविरोधात लढाई करुन स्वतंत्र मराठा साम्राज्य उदयास आले. याचमुळे जवळपास 350 वर्षांनंतरसुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांना देव मानलं जातं. महाराष्ट्रात देवानंतर कोणाची भक्तिभावाने पूजा केली जात असेल तर ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
या संपूर्ण काळात महाराजांनी अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्यासुद्धा. या सगळ्याच लढाऱ्या महाराष्ट्राच्या लक्षात असतीलच असं नाही पण काही थरारक घटना ठरवल्या तरी विसरता येणार नाहीत. त्यातील एक लढाई म्हणजे कोंढाण्याची. तान्हाजी मालूसरेंनी आपल्या शौर्याच्या आणि हिंमतीच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या कोंढाणा किल्ल्याची कामगिरी फत्ते केली. आजही महत्त्वाच्या प्रसंगी 'आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं' असं हमखास म्हटलं जातं. यावरुनच तान्हाजींची ही कामगिरी किती महत्त्वपूर्ण होती हे कळतं. शिवाजी, तान्हाजी आणि त्यांच्या एका शब्दावर हसत प्राणाची आहुती देणाऱ्या मावळ्यांची शौर्य गाथा म्हणजे अजय देवगणचा तान्हाजी: द अनसंग वॉरिअर सिनेमा.
असं असलं तरी ज्यांनी महाराजांचा इतिहास वाचला आहे त्यांना हा सिनेमा पाहताना अनेक गोष्टी खटकतात किंवा खटकू शकतात. सिनेमा जस जसा पुढे सरकत जातो तेव्हा आपण इतिहास पडद्यावर न पाहता एक कमर्शिअल सिनेमा पाहत आहोत याची जाणीव होत राहते. चित्रपटातील अनेक सीन पाहताना 'असा इतिहास आम्ही वाचला नव्हता' असे विचार सतत मनात येत राहतात. पण या सगळ्याला निर्माता, दिग्दर्शकांनी सिनेमॅटिक लिबर्टीचं लेबल लावल्यामुळे आपल्याला काही बोलताही येत नाही.
या सगळ्यात सत्यघटनेवर बेतलेल्या सिनेमांना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं योग्य आहे का हा मूळ मुद्दा आहे. कोणताही चित्रपट तयार करताना दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला तर त्यात काही गैर नाही असं मला वाटतं. पण याच लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शक सत्य घटना, त्याची मांडणी कशी काय बदलू शकतो हाही प्रश्न मला पडतो.
'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर सिनेमातही अशाच काही घटना अतिरंजित करुन दाखवल्या आहेत. मूळ इतिहासाला बगल देत सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चित्रपटात अनेक बदल केलेले दिसतात. पण या सिनेमांचा भावी पिढीवर दूरगामी परिणाम होऊ शकतो हे साधं त्यांच्या लक्षात येत नाही का? की फक्त आता पैसे कमवायचे पुढच्या पिढीचा विचार पुढे करु हेच धोरण मनात पक्क केलं आहे ते कळत नाही. काळ बदलतो तशी पिढीही बदलते. त्यानुसार आधीच्या पिढ्यांसारखी ही पिढी वाचन करत नाही, पोवाडे ऐकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या करणं आवश्यक आहे पण त्या होत नाहीत.
देशाची सध्याची पिढी ही चित्रीत (visuals) घटनांवर जास्त विश्वास ठेवते किंवा त्यालाच प्रमाण मानून चालते. ही अवस्था जर आताच्या पिढीची असेल तर मग पुढच्या पिढीबद्दल तर बोलायलाच नको. याच चित्रपटात काही उदाहरणे अशी आहेत की, ज्यामुळे भावी पिढीला इतिहास चुकीचा समजू शकतो असं मला वाटतं.
1. चित्रपटात उदयभान आणि तान्हाजी मालुसरेंची भेट लढाईच्या आधीच गडावर दाखवण्यात आली आहे. (इतिहासात तान्हाजी मालुसरे उदयभानाला थेट लढाईच्यावेळी कोंढाण्यावरच भेटतात.) तर या भेटीनंतर तान्हाजी मालूसरेंना उदयभानाने अटक करुन, साखळदंडाने बांधून ठेवलेलं दाखवण्यात आलं आहे. (खुद्द तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांनी यावर आक्षेप घेतला आहे)
2. मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी झालेल्या तहानंतर कोंढाणा किल्ला मुघलांकडे जातो. त्यावेळी आऊसाहेब या राजधानीत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. पण सिनेमात मुघल सैन्य जेव्हा कोंढाणा ताब्यात घ्यायला येते त्यावेळी आऊसाहेब कोंढाण्यावर दाखवल्या आहेत.
3. तान्हाजी मालुसरे जत्रेनिमित्त जेव्हा गडावर जातात त्यावेळी चित्रपटात ‘शंकरा रे शंकरा’ हे गाणं आहे. या गाण्यात अभिनेता अजय देवगन डान्स करतो त्यात एक डान्स स्टेप आहे ज्यात अजय देवगन स्वराज्याच्या मावळ्यांवर पाय ठेऊन डान्स करतानाचे दृश्य आहे. (अर्थात अद्याप यावर कुणीही आक्षेप घेतलेला नाही, पण जर हे चालू शकतं तर अक्षय कुमारची जाहिरात का नाही? मनाला पडलेला एक प्रश्न )
4. जेव्हा तान्हाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देतात. त्यावेळी त्यांना गडावर कोणत्यातरी मोहिमेची तयारी सुरु असल्याचं कळतं. यानंतर चित्रपटात एक प्रसंग असा दाखवला आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांसमोर ऋषींच्या वेशात असलेल्या तान्हाजी मालुसरेंना भेटतात. त्यानंतर तान्हाजी मालुसरे आणि शिवाजी महाराज यांच्यात झालेल्या संभाषणाच्यावेळी तान्हाजी मालुसरे राजांच्या अंगावर दंड (ऋषींच्या हातात असेलली काठी) फेकून मारतात.
5. चित्रपटाच्या अखेरीस तान्हाजी मालुसरे आणि उदयभानच्या लढाईच्या वेळी तान्हाजी उदयभानाला तोफेला बांधून गडावरुन खाली ढकलून देतात आणि कोंढाणा काबीज करतात. या सगळ्यात तान्हाजी मालुसरे महाराज येईपर्यंत हातात भगवा पकडून जिवंत राहतात. महाराज ज्यावेळी येतात तेव्हा तान्हाजी त्यांना आऊसाहेबांच्या पादुका देतात आणि महाराजांच्या मांडीवर प्राण सोडतात. (इतिहासात याचा उल्लेख कुठेच झालेला दिसत नाही. उलट महाराज यायच्या आधीच तान्हाजी मालुसरेंनी प्राण सोडले होते, असाच उल्लेख इतिहासात आपल्याला वाचायला मिळतो.)
चित्रपटातील या घटना अशा आहेत की ज्याची कथा/आख्यायिका कधी ऐकलेली आठवत नाही. जर या कथा आपण प्रमाण मानल्या तर राज्य सरकारने दिलेल्या पाठ्यपुस्तकातील कथेचं काय, हा प्रश्न उरतोच. एकंदरीतच आपण चित्रपटात काय पाहतो, त्याचे दूरगामी परिणाम काय? यावर खरंच विचार करण्याची वेळ आली आहे. भावी पिढ्यांच्या समोर महाराजांचा अजून कोणता इतिहास पुढे नेऊन ठेवणार आहोत हे माहित नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement