एक्स्प्लोर
भारत-पाकिस्तान युद्ध झालं तर काय होईल..?
2001 साली संसदेवर हल्ला झाला तेव्हाही भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय लष्कराला तर मार्चचे म्हणजे मिलिटरी स्टँड ऑफचे आदेश देण्यात आले होते. दोन महिने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचं सैन्य समोरासमोर बंदुका ताणून उभं होतं... प्रत्यक्षात कुठलंही युद्ध झालं नाही.. तरीही सीमेजवळ दोन महिने इतकं सैन्य उभं ठेवण्यासाठीच भारताला सुमारे 600 मिलियन डॉलर म्हणजेच सात हजार कोटी रुपयांच्या आसपास खर्च आल्याची माहिती स्ट्रॅटेजिक फॉरेन्सिक ग्रुपने दिलीये.
पुलवाम्यातल्या दहशतवादी हल्ल्यात आपले 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. एक भारतीय म्हणून या घटनेचं आपल्या सगळ्यांनाच दुःख होणं आणि संताप येणं साहजिक आहे. त्याच उद्वेगातून अनेकांच्या तोंडून युद्धखोरीची भाषा केली जातेय... सामान्य नागरिकांना अपुऱ्या माहितीमुळे बऱ्याचदा युद्ध हा सगळ्यात सोपा पर्याय वाटतो... असं वाटणाऱ्यांमध्ये जिथे प्रत्यक्ष युद्ध होतं त्या भागापासून पूर्णतः अपरिचित असणाऱ्या नागरिकांचा समावेश असतो. त्यामुळे युद्ध कसं असतं, युद्धजन्य परिस्थिती कशी असते, युद्धाची काय किंमत मोजावी लागते, याची फारशी जाणीव त्यांना नसते.. देशभक्तिपर गाणी किंवा बॉर्डर, एलओसी, उरी अशा फिल्म बघून इन्स्पायर झालेले नागरिक युद्धाची भाषा करतात. एक बॉम्ब टाकावा आणि पाकिस्तानला उडवून टाकायचं आणि मिटली एकदाची झंझट असं बोलण्याइतकं ते सोपं नाहीये..आंतरराष्ट्रीय राजकारणात मैत्री ही फायदे बघून केली जाते आणि शत्रुत्व हे सगळ्या गणितांचा विचार करुनच निभवलं जातं. युद्धाची आरोळी ठोकताना होणारे परिणाम आणि त्याची चुकवावी लागणारी किंमत याचाही विचार करावा लागतो. जरा आपण भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाचा इतिहास बघू..
आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये चार वेळा युद्ध झालं
पहिलं युद्ध झालं 1948 साली तेव्हा भारताचे 1 हजार 104 जवान शहीद झाले तर पाकचे 1 हजार 500
दुसरं युद्ध झालं 1965 साली तेव्हा भारताचे 3 हजार 264 जवान शहीद झाले तर पाकचे 3 हजार 800
तिसरं युद्ध झालं 1971 साली तेव्हा भारताचे 3 हजार 843 जवान शहीद झाले तर पाकचे 7 हजार 900
चौथं युद्ध झालं 1999 साली तेव्हा भारताचे 522 जवान शहीद झाले तर पाकिस्तानचे 696
या सगळ्या युद्धांमध्ये किती नागरिक मारले गेले आणि काय नुकसान झालं याची तर गणतीच नाही. चार युद्ध झाली चारही आपण जिंकली पण प्रश्न सुटला?
2001 साली संसदेवर हल्ला झाला तेव्हाही भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय लष्कराला तर मार्चचे म्हणजे मिलिटरी स्टँड ऑफचे आदेश देण्यात आले होते. दोन महिने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचं सैन्य समोरासमोर बंदुका ताणून उभं होतं... प्रत्यक्षात कुठलंही युद्ध झालं नाही.. तरीही सीमेजवळ दोन महिने इतकं सैन्य उभं ठेवण्यासाठीच भारताला सुमारे 600 मिलियन डॉलर म्हणजेच सात हजार कोटी रुपयांच्या आसपास खर्च आल्याची माहिती स्ट्रॅटेजिक फॉरेन्सिक ग्रुपने दिलीये. सैन्य समोरासमोर फक्त उभं ठेवण्याचा दररोजचा खर्च हा 14.6 बिलियन डॉलर इतका होता. तर पाकिस्तानचा फक्त 3.7 बिलियन डॉलर इतका होता. टक्केवारीचा विचार करायचा झाल्यास भारताच्या तुलनेत पाकिस्तान प्रतिमाणसी संरक्षणावर त्याच्या एकूण जीडीपीच्या दुप्पट खर्च करतो. हा खर्च पाकिस्तानच्या जीडीपीच्या १०.६ टक्के इतका आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅडव्हान्स स्टडीजच्या माहितीनुसार पाकिस्तानकडे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली हत्फ आणि घोरी ही जमिनीवरुन मारा करणारी बॅलिस्टीक मिसाईल आहे ज्याच्या कक्षेत भारतातील दिल्ली, लखनौ, जयपूर, अहमदाबाद, पुणे बंगळुरु, मुंबई आणि चेन्नई ही शहरं येतात. एकाही शहरावरचा हल्ला आणि त्यात होणारा विध्वंस आपल्या कल्पनेच्या पलिकडचा असेल त्यामुळे तो आपल्याला बिल्कुल परवडणारा नाहीये.
त्यामुळे यापूर्वीच्या पाकसोबत झालेल्या चार युद्धांसारखा विचार आता करता येणार नाहीये कारण आता परिस्थिती आधीच्या तुलनेत खूप बदललीये.
या आधीची युद्ध ठराविक भागात लढली गेली, पण आता युद्धाच्या कक्षेत भारतातलं प्रत्येक शहर येऊ शकतं. अशा वेळी काय नुकसान होऊ शकतं, याची एकदा कल्पना करा.. अमेरिकेतल्या वैज्ञानिकांची संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या सप्टेंबर 2018 मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार पाकिस्तानजवळ 140 ते 150 अणुबाँम्ब असू शकतात. तर भारताकडे 130 ते 140 च्या आसपास आहेत. याचा अर्थ पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अणुबाँम्ब आहेत. आता विचार करा जर युद्ध झालं आणि आण्विक युद्धाला तोंड फुटलं तर काय होईल.. डोकं ठिकाणावर नसलेल्या पाकिस्तानच्या नेतृत्वाने मुंबईसारख्या लाखो-करोडोंची वर्दळ असणाऱ्या शहरावर एखादा अणुबॉम्ब टाकला तर.? किती लोक मरतील? एक चालतं बोलतं शहर कित्येक दशकांसाठी क्षणात उद्ध्वस्त होईल.....बरं एकच अणुबाँम्ब टाकून युद्ध थांबेल का तर बिल्कुल नाही..त्याला आपण उत्तर म्हणून अणुबाँम्ब टाकू, मग पुन्हा ते टाकतील...पण यात खोट्या राष्ट्रप्रेमाच्या युद्धखोरीपायी आणि तिकडची माणसं मारली की आपला बदला पूर्ण या आडमुठेपणामुळे लाखो निष्पाप नागरिक मारले जातील. ज्यांनी कदाचित कधीच एकमेकांचं वाईट चिंतलंही नसेल... इतकं सगळं स्वतःचं नुकसान करुन घेऊन जे उरलं, तो बदला असेल की पाकिस्तानातल्या निष्पाप नागरिकांचे जीव घेणं हा आपला बदला आहे? माणुसकी ही आपल्या संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे.. माणसं मारणाऱ्यांपैकी आपण कधीच नव्हतो म्हणून आपण वेगळे आहोत..भारतीय आहोत.....
रुटगर युनिव्हर्सिटी, युनिवर्सिटी ऑफ कोलॅरॅडो आणि युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या अभ्यासानुसार उद्या जर भारत-पाक युद्धात दोन्ही देशांनी त्यांच्या एक तृतीयांश न्युक्लीअर बॉम्बचा (100) वापर केला तरी 2 कोटींपेक्षा जास्त नागरिक पहिल्याच आठवड्यात मरतील (ही संख्या दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्यांच्या अर्धी आहे) आणि अर्धा ओझोनचा थर नष्ट होईल. ज्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांचा शिरकाव थेट पृथ्वीच्या वातावरणात होईल. त्यामुळे कॅन्सरसारख्या अनेक आजारांबरोबर पृथ्वीच्या तापमानात प्रचंड वाढ होईल.. न्युक्लीयर हल्ल्यामुळे जे नैसर्गिक संकट ओढवेल त्यामुळे जगभरात 2 अब्ज नागरिक प्रभावित होतील....सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढे भारतीय या युद्धात मरतील त्यांची संख्या 2015 पर्यंतच्या नऊ वर्षात भारतावर झालेल्या दहशवादी हल्ल्यात जेवढे नागरिक आणि सैनिक मारले गेले, त्याच्या 2,221 पटींनी जास्त असेल. न्युक्लियर बाँम्बच्या वापरामुळे वातावरणात मोठे बदल होऊन भारतीय उपखंडात ज्यामुळे सुबत्ता आहे तो मान्सून नष्ट होऊ शकतो...आणि जर मान्सूनच नसेल तर भारतीय शेतीही मरणासन्न होईल. समजा आपण पाकिस्तानवर न्यूक्लियर बाँम्ब टाकला तर त्याचे वातावरणीय परिणाम फक्त पाकिस्तानवरच नाही तर आसपासच्या अफगाणिस्तान आणि भारतावर देखील होतील. त्यामुळे युद्धखोरीची भाषा करणारी माध्यमं आणि आर्मीशी फारसा संबंध नसलेले पण जे करमणूक म्हणून युद्धाकडे बघतात अश्या 'TYPICAL' मध्यमवर्गीयांनी भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं तर काय होईल..? हा विचार जरा आपल डोकं ठिकाणावर ठेऊन करावा.
पण याचा अर्थ असा नाही की आपले जवान सीमेवर मरतायत आणि आपण काहीच करायचं नाही....बदलाही घ्यायचा आणि अद्दलही घडवायची पण वेगळ्या मार्गाने.. कूटनीती स्तरावर आपण पाकिस्तानला जेरीस आणू शकतो, आर्थिक कोंडी करु शकतो.. पाकिस्तान विरोधात नुकतेच 40 देश आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र आले आहेत. नाक दाबलं की तोंड उघडतं अशी एक म्हण आहे. अगदी तसंच आपल्याला पाकिस्तानसोबत करावं लागेल. मसूद अझरला सोडतानाच तेव्हाच्या सरकारने शंभरवेळा विचार करायला हवा होता.. तेव्हा चूक झाली आणि अजून आपण त्याचे परिणाम भोगतोय. युद्ध प्रत्येक वेळी बंदुकीने युद्धभूमीवरच लढलं जातं, असं नाही. या सगळ्या पर्यायांचा विचार सत्ताधारी करतीलच. वर्षानुवर्ष चालणारी ही प्रक्रिया आहे. पण युद्ध हा पर्याय मात्र नक्कीच नाही...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement