एक्स्प्लोर
'शॉ'नदार...
मुंबईच्या पृथ्वी शॉनं आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून राजकोट कसोटीत पदार्पणात शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी शॉ हा पंधरावा भारतीय फलंदाज ठरला आहे. पृथ्वी शॉनं मुंबईतल्या आंतरशालेय क्रिकेटमध्ये ५४६ धावांचा विश्वविक्रम रचला, त्या वेळी भारतीय क्रिकेटरसिकांना त्याची पहिल्यांदा ओळख झाली. तिथून पृथ्वीनं साडेचार वर्षांमध्ये विराट कोहलीच्या भारतीय संघात कशी मजल मारली?
मुंबईच्या पृथ्वी शॉनं कसोटी पदार्पणात शतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपला ठसा उमटवला.
पृथ्वीनं आधी रणजी आणि मग दुलीप करंडकातल्या पदार्पणात शतक ठोकून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधल्या आपल्या आगमनाचा बिगुल वाजवला होता. त्याच पृथ्वीनं राजकोट कसोटीत पदार्पणात शतक साजरं करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आपल्या आगमनाची वर्दी दिली. त्यानं १५४ चेंडूंमध्ये १९ चौकारांच्या सहाय्यानं १३४ धावांची खेळी उभारली.
वास्तविक न्यूझीलंडमधल्या अंडर नाईन्टिन विश्वचषकानं तर पृथ्वी शॉ हा भारतीय क्रिकेटचं भविष्य असल्याचं दाखवून दिलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं अंडर नाईन्टिनचा विश्वचषक चौथ्यांदा जिंकला, तो याच वर्षी. त्या विश्वचषकात पृथ्वी एक फलंदाज आणि एक कर्णधार म्हणूनही प्रकर्षानं चमकला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं सहापैकी सहा सामने जिंकून विश्वचषकावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पृथ्वीनं या विश्वचषकात सहा सामन्यांमधल्या पाच डावात 261 धावांचा रतीब घातला. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. त्यात 94 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.
साहजिकच अंडर नाईन्टिन विश्वचषकातल्या टॉप टेन फलंदाजांत त्याचा समावेश झाला. आयसीसीच्या अंडर नाईन्टिन ड्रीम टीममध्येही सलामीचा फलंदाज म्हणून त्याची निवड झाली. अंडर नाईन्टिन विश्वचषकानं पृथ्वीच्या फलंदाजीतल्या गुणवत्तेची आणि नेतृत्वगुणांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पहिल्यांदा ओळख झाली असली तरी मुंबई क्रिकेटसाठी त्याची कर्तबगारी ही नवी नाही.
पृथ्वी शॉच्या गुणवत्तेची मुंबईकरांना पहिल्यांदा ओळख झाली ती 2013 सालच्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत. या स्पर्धेत फ्रान्सिस डी अॅसिसीविरुद्धच्या सामन्यात त्यानं 546 धावांची विश्वविक्रमी खेळी उभारली होती. त्या खेळीनंतर पृथ्वीनं एबीपी माझाला दिलेली मुलाखत आजही आमच्या संग्रहात आहे.
पृथ्वीनं हॅरिस शिल्डच्या मैदानात विश्वविक्रमी खेळी उभारली तेव्हा तो अवघ्या चौदा वर्षांचा होता. गेल्या साडेचार वर्षांमध्ये एक फलंदाज म्हणून तो आणखी प्रगल्भ झाला आहे. रणजी पदार्पणात शतक, दुलीप पदार्पणात शतक आणि आता कसोटी पदार्पणात शतक हे त्याच्या प्रगल्भतेचंच प्रतीक आहे. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पृथ्वीच्या नावावर आज सात खणखणीत शतकं आणि तीन अर्धशतकं आहेत. पृथ्वी शॉनं बॉय इन ब्ल्यू म्हणून याच फेब्रुवारीत भारताला अंडर नाईन्टिनचा विश्वचषक जिंकून दिला होता. आज त्यानं मेन इन व्हाईट्सच्या लीगमध्येही आपलं स्थान निर्माण केलं.
भारतीय क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेली मुंबई ही आजही फलंदाजांची खाण आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसारखे फलंदाज याच मुंबईनं आजच्या टीम इंडियाला दिले आहेत. त्या दोघांच्या खांद्याला खांदा भिडवून लहानाचा मोठा झालेला पृथ्वी हा फलंदाजीच्या खाणीतला नवा हिरा आहे. अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या निमित्तानं त्या हिऱ्याला राहुल द्रविड नावाच्या कारागिरानं पैलू पाडले. त्यामुळं पृथ्वी शॉ नावाचा हिरा आता आणखी तेजानं झळाळू लागला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधली राजकोट कसोटी त्याच तेजानं उजळून निघाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement