एक्स्प्लोर
बजरंगाची सोनेरी कमाल
पैलवान बजरंग पुनियाने जकार्ता एशियाडमध्ये मिळवलेलं सोनेरी यश हे डोळे दिपवणारं आहे. पण या यशाने बजरंग पुनियावरच्या अपेक्षांचं ओझंही वाढवलं आहे. या अपेक्षा आहेत 2020 सालच्या टोकियो ऑलिम्पिकमधल्या पदकाच्या...
पैलवान बजरंग पुनियाने जकार्ता एशियाडच्या मॅटवर आपलं नाणं अगदी खणखणीत वाजवून दाखवलं. बजरंगने जपानच्या ताकातानी दाईचीचं आव्हान 10-8 असं मोडून काढून जकार्ता एशियाडच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
बजरंग पुनियाचं एशियाडच्या इतिहासातलं हे दुसरं पदक ठरलं. 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये त्याला 61 किलो फ्रीस्टाईलच्या रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. बजरंग यंदा वरच्या वजनी गटात म्हणजे 65 किलोत खेळला, पण त्याने सांगून या गटाचं सुवर्णपदक जिंकलं. बजरंग पुनियाचा ज्येष्ठ सहकारी आणि त्याचा गुरु योगेश्वर दत्तने 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये सोनेरी यश मिळवलं होतं. यंदा जकार्ता एशियाडमध्ये आपणही सुवर्णपदक जिंकू, असा शब्द बजरंगने योगेश्वर दत्तला दिला होता. तो त्याने खरा ठरवला.
एशियाडच्या इतिहासात सुवर्णपदकाची कमाई करणारा बजरंग पुनिया हा भारताचा सातवा पैलवान ठरला. याआधी कर्तारसिंग यांनी एशियाडच्या कुस्तीत दोन सुवर्णपदकं पटकावली आहेत. त्याशिवाय सत्पालसिंग, राजिंदरसिंग, चंदगीराम, मारुती माने आणि योगेश्वर दत्त यांच्या खजिन्यात एशियाडचं एकेक सुवर्णपदक आहे.
बजरंग पुनियाने जकार्ता एशियाडचं हे सुवर्णपदक भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केलं. बजरंगच्या या कृतीचं विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं.
बजरंग पुनियाचा जन्म हरयाणातल्या झज्जर जिल्हयातल्या खुदान गावचा. हरियाणा म्हणजे पैलवानांची खाण. आज कुस्तीच्या जागतिक नकाशावर हरयाणवी पैलवानांनीच भारताचं नाव ठळक केलं आहे. बजरंग पुनिया हाही त्यापैकीच एक. बजरंगने वयाच्या सातव्या वर्षापासूनच कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. त्यामुळे कुस्तीत कारकीर्द घडवण्याचा त्याचा निर्णय कळत्या वयात यायच्या आधीच पक्का झाला होता. बजरंगच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. पण कुस्तीत कारकीर्द करण्याचा योग्य वयात घेतलेला निर्णय आणि त्याच्या निर्णयाला घरच्यांनी दिलेली साथ यामुळं आज वयाच्या चोविसाव्या वर्षीच पदकांच्या बाबतीत तो श्रीमंत पैलवान झाला आहे.
बजरंगच्या खात्यात एशियाडच्या एक रौप्य आणि एक सुवर्ण अशा दोन पदकांशिवाय जागतिक कुस्तीचं कांस्यपदक जमा आहे. लागोपाठच्या दोन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याच्या नावावर अनुक्रमे एक रौप्य आणि एक सुवर्णपदक आहे. बजरंगने आशियाई कुस्तीत चार आणि राष्ट्रकुल कुस्तीत दोन पदकं पटकावली.
बजरंगच्या खात्यात आता एकाच पदकाची उणीव जाणवते ते म्हणजे ऑलिम्पिक पदक. त्यामुळे साहजिकच जकार्ता एशियाडमधल्या सोनेरी यशाने 2020 सालच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियावरच्या अपेक्षांचं ओझं वाढलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement