Blog : पंजाबच्या वाघाची बॅटीतून डरकाळी
Shubman Gill Outstanding Performance in IPL 2023 : शुभमन गिल या तरण्याबांड क्रिकेटपटूचं सध्या सर्वजण तोंड भरून कौतुक करत आहेत. आणि त्याचं कौतुक का करू नये? 26 मे रोजी त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली कामगिरी अगदी तुफानी होती. किंबहुना मुंबईला आयपीएलच्या फायनलमध्ये रोखण्याची धाडसी कामगिरी शुभमनने केली म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्या 26 मे रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये चुरशीची लढत झाली. कारण यातून विजेता संघ फायनलला चेन्नईशी दोन हात करण्यासाठी जाणार होता. अशातच गुजरातच्या टीमने सुरुवातील बॅटिंग करताना 233 ची खेळी केली. त्यात शुभमनचा वाटा होता 129 धावांचा.
अगदी आकड्याच्या भाषेत बोलायचं तर शुभमनने अवघ्या 60 बॉलमध्ये 129 धावा झोडून काढल्या होत्या. हो झोडूनच म्हणावं लागेल कारण त्याने पहिल्या 32 बॉलमध्ये अर्धशतक मारलं. त्यानंतर पुढच्या 17 बॉलमध्ये 50 धावा काढल्या. आणि हे कमी म्हणून की काय शेवटच्या 11 बॉलमध्ये 29 धावा काढल्या. शुभमनच्या बॅटिंगमध्ये इतका आत्मविश्वास होता की, मुंबई इंडियन्सचे सर्व बॉलर हतबल झाले होते. हा पठ्ठ्या कुठल्या बाजूला चेंडू सीमापार करेल, याचा कुणालाच अंदाज येत नव्हता. त्याने मुंबई इंडियन्सच्या प्रत्येकाला सळो की पळो करून सोडलं होतं.
आयपीएलचा यंदा सोळावा हंगाम. या हंगामात शुभमनची कामगिरी जबरदस्त आहे. रॉयल चॅलेजर्स बंगळुरुचा विराट कोहली, राजस्थानचा जोस बटलर यांच्या पाठोपाठ शुभमन गिलचा नंबर आहे. विराट कोहलीने 16 सामन्यांत 4 शतकांसह 973 धावा काढल्यात. जोसने 17 सामन्यात 4 शतकांसह 863 धावांची कमाई केली आहे. तर शुभमने 16 सामन्यात 3 शतके ठोकली असून एकूण 851 धावा काढल्या आहेत.
पंजाबच्या या 24 वर्षांच्या वाघानं 20-20, एकदिवसीय आणि कसोटी अशा क्रिकेटच्या तिन्ही फॉर्ममध्ये धडाकेबाज कामगिरी केलीय. मैदानात आक्रमक असलेला शुभमन मैदानाबाहेर आला की अगदी साधासुधा असतो. शांतपणे खु्र्चीवर बसतो आणि इतरांच्या खेळण्याचा आनंद घेतो. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य इतकं लोभसवाणं असतं की कुणीही त्याच्या प्रेमात पडावं. म्हणूनच मुंबई इंडियन्सविरोधातील त्याच्या कामगिरीचं सचिन तेंडुलकरलाही कौतुक करण्याचा मोह आवरला नाही.
यंदाचा आयपीएलचा सीझन शुभमन गिलने त्याच्या तडाखेबाज बॅटिंगने गाजवला. शुभमनची एक स्टाईल सर्वांचंच लक्ष वेधून घेते. त्याने अर्धशतक किंवा शतकी खेळी केली की तो कमरेतून वाकून प्रेक्षकांना अभिवादन करतो, त्याची ही लकब आता खूप लोकप्रिय झाली आहे आणि म्हणूनच प्रेक्षकही त्याच्यावर फिदा आहेत. पंजाबच्या प्रथम श्रेणी, त्यानंतर 19 वर्षांखालील संघ, पुढे टीम इंडियात निवड झालेल्या शुभमनची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चालली आहे, ही भारतासाठी खूप जमेची बाजू आहे.