बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून सोडण्यात येत आहे.

Belgaum Municipal Corporation: आज एक नोव्हेंबर रोजी कर्नाटकाचा राज्योत्सव दिन असल्याने बेळगावात महानगरपालिकेने कानडीकरणाचा वरवंटा फिरवण्यास पुन्हा प्रारंभ केला आहे. व्यापारी आस्थापनावरील इंग्रजी आणि मराठी भाषेत असलेल्या फलकावर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रंग लावला. यामुळे जनतेत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इंग्रजी, मराठी फलकावरील कारवाईच्या वेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. यापूर्वी देखील शहरातील सगळ्या फलकावरील साठ टक्के जागेत कन्नड मजकूर असला पाहिजे असा फतवा काढण्यात आला होता. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी भाषेत व्यापारी आस्थापनाचे नाव लहान अक्षरांत लिहिण्यात आले होते.आज देखील इंग्रजी, मराठी फलकावर कारवाई करण्यास प्रारंभ केल्यावर केवळ इंग्रजी, मराठीत फलक असलेल्या व्यापाऱ्यांनी फलकावर कापड झाकून कारवाई टाळून घेतली. एक नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव असल्याने कन्नड संघटना अनेक मागण्या करत आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त
दरम्यान, काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून सोडण्यात येत आहे. मराठी बांधवांच्या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी सहभागी होऊ नये म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक नोव्हेंबरच्या बेळगावमधील काळ दिन कार्यक्रमाला महाराष्ट्रातून नेते सीमा भागात जात असतात.
कोल्हापुरातील शिवसेना नेत्यांना जिल्हाबंदी
हातकणंगले खासदार धैर्यशील माने, ठाकरेंच्या शिवसेनचे विजय देवणे, शिवसेना उपनेते संजय पवार, सुनील मोदी आणि सुनील शिंत्रे यांना आज बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. दरम्यान, बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती शनिवारी कर्नाटक राज्योत्सव दिनी काळा दिन पाळणार आहे. खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापुरातील शिवसेना नेते शनिवारी काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आक्षेपार्ह भाषण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेळगावातील कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे असे पत्र बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. निपाणीच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापुरातील शिवसेना नेत्यांना काळा दिन कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असल्याची माहिती मिळाली असल्याचे पत्रात बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी नमूद केले आहे. या पत्राला अनुसरून बेळगावचे जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांनी खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते विजय देवणे, संजय पवार, सुनील शिंत्रे आणि सुनील मोदी यांना बेळगाव जिल्ह्यात एक नोव्हेंबर रोजी प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























